महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळुमामा यांच्या भंडारा उत्सवानिमित्त (सोमवार) श्रींच्या जागरादिवशी बाळुमामा यांच्या रथाची निढोरी ते आदमापूर मार्गावर मिरवणूक काढण्यात आली. हजारो भाविकांच्या उपस्थित पार पडलेली ही मिरवणूक तब्बल चार तास चालली. श्रींच्या रथाला ओढण्याचा मान राजाभाऊ शिंदे रांजणगाव सांडस ता. यांच्या बैल जोडीस मिळाला. आदमापूर-निढोरी दरम्यान असणाऱ्या तीन किमी अंतरात भक्तीचा जागर अनुभवयास मिळाला.
कोरोनामुळे बाळूमामांचा भंडारा उत्सव गेले दोन वर्षे झाला नव्हता. कोरोनाचे निर्बंध पुर्ण हटवल्याने उत्साही वातावरणात भक्तांच्या अमाप गर्दी मध्ये यात्रा सुरू झाली. तब्बल दहा दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, गोवा राज्यातील लाखो भाविक उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. भक्ताच्या मनात भंडारा यात्रेमुळे आनंदी, उत्साही वातावर दिसून येत आहे. ढोल, कैताळाच्या आवाजात धनगरी बांधव दंग झाला होता. हलगी, घुमक्याच्या ठेक्यावर डोलणारा भक्त वर्गाबरोबरच डॉल्बीच्या ठेक्यावर तरुणाई तल्लीन होऊन नाचत होती. भंडाऱ्याच्या मुक्तहस्ते उधळणीत भक्त रंगून गेला होता.
22 मार्च पासून 2 एप्रिलपर्यंत तब्बल दहा दिवस यात्रा होत आहे. 28 रोजी जागराचा दिवस असल्याने राजस्थान, मध्यप्रदेश येथील धनगर बांधवांनी सुमारे पन्नास लाख रुपये खर्चून दिलेल्या रथामध्ये बाळुमामाची 138 किलो चांदीची मूर्ती बसवण्यात आली होती. रथाला रंगबेरंगी फुलाची आकर्षक सजावट करण्यात आली होती. बाळू मामाच्या अठरा बकऱ्याच्या कळपातून आलेल्या दुधाचे कलश यावेळी सहवाद्य मिरवणूकने आणण्यात आले.