आमदार चंद्रकात जाधव यांच्या निधनाने झालेल्या रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी रणधुमाळी रंगली आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सोमवारी दोघा अपक्षांनी माघार घेतल्याने 15 उमेदवार नशीब आजमावणार आहेत. अर्ज माघे घेण्याची मुदत संपल्यानंतर चिन्हांचे वाटप करण्यात आले. आता प्रचाराने गती घेतली आहे. एकूण 17 अर्ज दाखल झाले होते. यापैकी अस्लम सय्यद व संतोष बिसूरे या अपक्षांनी अर्ज मागे घेतले.
मात्र, अस्लम सय्यद यांनी माघार घेतल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या. २०१९ मध्ये त्यांनी कोणालाही माहीत नसतानाही हातकणंगले मतदारसंघात सव्वा लाखांवर मते घेऊन चांगलीच खळबळ उडवून दिली. त्यामुळेच राजू शेट्टींना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांचा जवळपास ९० हजार मतांनी पराभव झाला. वंचितकडून त्यांना उमेदवारी मिळाली होती. त्यामुळे अस्लम सय्यद यांनी कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी माघार घेतल्याने चर्चा सुरु झाली.
दरम्यान, या माघारीसाठी मुंबईतून हालचाल झाली नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरध्वनीवरून चर्चा करून त्यांना मुंबईसाठी निमंत्रण दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा काँग्रेसला मतदारसंघ सोडून मोठा निर्णय घेतला होता. आता त्यांनी आणखी एक निर्णय घेत अस्लम सय्यद यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे अस्लम सय्यद यांनी माघार घेतली.
त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. दुसरीकडे त्यांनी हातकणंगले मतदारसंघात मिळालेली मते पाहता ते कोणाला किती धक्का पोहोचवू शकतात, याची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे संभाव्य मतविभागणी टाळण्यासाठी शिवसेनेने उच्चस्तरीय यंत्रणा कामाला लावली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अस्लम सय्यद यांची मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्याने मोठा दिलासा महाविकास आघाडीला दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना हात आणि भाजपाचे सत्यजित कदम यांना कमळ हे चिन्ह मिळाले. प्रचारासाठी तेरा दिवस मिळणार आहेत.17 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. एका मतदान यंत्रावर 16 उमेदवार आणि एक नोटा असे 17 रकाने असतात. दोघांनी माघार घेतली नसती तर मतदानासाठी दोन मतदान यंत्र बसवावी लागली असती. मात्र दोघांच्या माघारीने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला.