दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान-२ विषयाचा पेपर बुधवारी (दि.३०) होत आहे. दरम्यान हा पेपर जयसिंगपूरमध्ये फुटल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर जयसिंगपूर शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. ही घटना समजताच सामाजिक कार्यकर्त्यांनी पेपर कस्टडी असणाऱ्या शाळेत गोंधळ घातला.
दरम्यान, यासंदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दहावीचा विज्ञान विषयाचा पेपर फुटला नसल्याचे सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल विज्ञान व तंत्रज्ञान भाग-2 विषयाचा सांकेतांक क्रमांक N-397 आहे. परंतु प्रत्यक्षात मूळ प्रश्नपत्रिकेची तपासणी केल्यानंतर विज्ञान-तंत्रज्ञान विषय मराठी माध्यमांचा सांकेतिक क्रमांक N-744 व इंग्रजी माध्यमांचा N-745 असल्याचे दिसून आले आहे.
व्हायरल प्रश्नपत्रिकेतील कंटेंट पूर्णपणे वेगळा आहे. कोणीतरी खोडसाळपणे सोशल मीडियावर पेपर व्हायरल केला आहे. पेपर फुटलेला नाही. या प्रकरणाची तपासणी व शहानिशा करण्याचे निर्देश कोल्हापूर बोर्डाचे अध्यक्ष सत्यवान सोनवणे यांना दिले आहेत. याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे गोसावी यांनी सांगितले.