ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगाची चिंता वाढवली होती. आता कुठे कोरोनाचा (Covid-19) वेग मंदावत चालला होता. पण पुन्हा कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. भारतामध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी होत चालली आहे. त्याचप्रमाणे जगभरातील इतर काही देशामध्ये कोरोना विषाणूचा कहर कमी झाला असताना चीन, फ्रान्ससह अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. चीनची राजधानी शांघायमध्येही कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) माहिती दिली आहे की, कोरोना विषाणूचा एक नवीन व्हेरिएंट आढळला आहे. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचे नाव XE असे आहे. हा नवा व्हेरिएंट कोरोनाच्या पूर्वीच्या ओमिक्रॉनच्या BA.2 प्रकारापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. ओमिक्रॉनचे BA.2 कोरोनाचा सब-व्हेरिएंट कोविड-19 चे आतापर्यंतचे सर्वात संसर्गजन्य व्हेरिएंट होते. कोरोनाचा हा व्हेरिएंट भारतासह जगातील अनेक देशांमध्ये पसरले आणि त्यामुळे मोठे नुकसान झाले.
WHOने सांगितले आहे की, कोविड-19 चे नवीन व्हेरियंट XE हे ओमिक्रॉनच्या दोन व्हेरिएंटचे बनलेले आहे. ओमिक्रॉनचा व्हेरिएंट BA.1 आणि BA.2 यापासून हा व्हेरिएंट तयार झाला आहे. हा व्हेरिएंट सध्या जगभरातील काही देशांमध्येच दिसला आहे. WHOने एका अहवालात म्हटले आहे की, ‘एक्सई रीकॉम्बिनेंट (Ba.1-Ba.2) सर्वात आधी 19 जानेवारी रोजी यूकेमध्ये आढळून आला. तेव्हापासून त्याच्या 600 पेक्षा कमी सीक्वेन्सची नोंद झाली आहे. WHOने म्हटले आहे की, ‘प्राथमिक अंदाजानुसार, हा नवीन सब-व्हेरिएंट XE BA.2 पेक्षा 10 टक्के जास्त संसर्गजन्य आहे. पण या दाव्याला अजून पुष्टी आवश्यक आहे.’