ताजी बातमी ऑनलाइन टीम
पत्नी नांदायाला येत नाही म्हणून पती (Husband)ने पत्नी (Wife)च्या गळ्यावर ब्लेड (Blade) मारून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. नागेश विष्णु देवकुळे असे आरोपी पतीचे नाव आहे. तर बासमती नागेश देवकुळे असे पीडित पत्नीचे नाव आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नागेशला तात्काळ अटक करत न्यायालयात हजर केले. न्यायालयाने नागेशला चार दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.
सासूच्या छळाला कंटाळून माहेरी आली होती महिला
बासमती हिची सासू छाया विष्णू देवकुळे ही सतत तिला घरकामावरुन, मूलबाळ होत नाही म्हणून शारिरीक आणि मानसिक त्रास द्यायची. याच छळाला कंटाळून बासमती सासरचे घर सोडून माहेरी गेली होती. आरोपी नागेश हा पत्नीला घेण्यासाठी तिच्या माहेरी गेला होता. तिथे त्याने तू आताच माझ्यासोबत नांदायला ये म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बासमतीला जमिनीवर पाडून तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी बासमतीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस पुढील तपास करीत आहेत.