ताजी बातमी ऑनलाइन टीम
गुढीपाडव्याच्या (Gudipadwa 2p22) शुभ मुहूर्तावर सुरु झालेली मुंबई मेट्रो (Mumbai Metro) अवघ्या दोन दिवसात बंद पडली आहे. तब्बल सात वर्षानंतर दोन मेट्रो मार्ग वाहतुकीसाठी सुरु करण्यात आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र दोन दिवसांतच ही मेट्रो बंद पडली आहे. त्यामुळे प्रवाश्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही तांत्रिक कारणांमुळे मेट्रो बंद पडली असल्याची माहिती मुंबई मेट्रोकडून देण्यात आली आहे. तसंच मुंबई मेट्रोने ट्वीट करत याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
मुंबई मेट्रोने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन ट्वीट करत मुंबई मेट्रो बंद पडल्याची माहिती दिली. मुंबईच्या मागाठणे ते आरे या मार्गावरील मेट्रो सेवा तांत्रिक कारणांमुळे बंद पडली असल्याचे मुंबई मेट्रोने सांगितले. महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशनने (Maha Mumbai Metro Operation Corporation) ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, ‘तांत्रिक कारणांमुळे मागाठणेकडून आरेकडे जाणारी मेट्रो सेवा बंद करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी दुसऱ्या मेट्रोची सोय करण्यात आली आहे. असुविधेबद्दल क्षमस्व!’
मुंबई मेट्रोच्या ‘मेट्रो-7’ आणि ‘मेट्रो -2 अ’ या दोन 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. 2 एप्रिलला गुडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी या मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला होता. हा मार्ग सुरु झाल्यामुळे मुंबईकरांना आनंद झाला होता. पण दोन दिवसांतच काही तांत्रिक कारणामुळे मेट्रो सेवा बंद करण्यात आली. जून 2014 ला मुंबई मेट्रोचा पहिला मार्ग म्हणजेच घाटकोपर ते वर्सोवा सुरु करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईत इतर पाच मेट्रो मार्गाचे काम टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आले होते. त्यापैकीच असलेल्या मेट्रो-7 आणि मेट्रो -2 अ हे दोन मेट्रो मार्ग देखील 2 एप्रिलपासून सुरु करण्यात आले.