ताजी बातमी ऑनलाइन टीम
राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन होऊन अडीच वर्षे लोटली. या काळात महाविकास आघाडीत अनेकदा धुसफुस पाहायला मिळाली. शिवसेना आणि काँग्रेस आमदारांनी निधी वाटपावरून अनेकदा तक्रारीही केल्या. भाजपकडून अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. तर महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या (Central Investigation Agency) धाडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येतेय. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात चालू महिन्यात मोठे फेरबदल होणार आहेत, तशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळतेय.
महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहखात्यावरुन शिवसेना नाराज असल्याची चर्चा सुरु आहे. चंद्रकांत खैरे यांच्यासारख्या नेत्यांनी तर मुख्यमंत्र्यांनी गृहखातं आपल्याकडे ठेवावं अशी मागणी केली. दुसरीकडे निधीवाटपावरुन शिवसेना आणि काँग्रेसचे आमदार उघडपणे जाहीर व्यासपीठावर नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जातं. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून मात्र सरकारचा कारभार सुरुळीतपणे सुरु असल्याचा दावा करत, हे सरकार पाच वर्षे टीकणार असा विश्वास व्यक्त केला जातोय. असं असलं तरी महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात चालू महिन्यातच मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळतेय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात महत्वाची बैठक होणार असल्याचीही माहिती मिळत आहे.