ताजी बातमी ऑनलाइन टीम
दुरसंचार सेवांमध्ये दररोज नवनवी क्रांती होत आहे. त्यातच भारतातील आघाडीची असलेल्या एअरटेलने मंगळवारी 5G वर इमर्सिव्ह व्हिडिओचे (immersive video) अनावरण करीत भविष्यातील आपले दुरसंचार क्षेत्रातील क्रांतीकारी मनसुबे स्पष्ट केले आहेत. एअरटेलने इमर्सिव्ह व्हिडिओ अनुभव आणि भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचा देशातील पहिला 5G पॉवर्ड होलोग्राम (hologram) देखील प्रदर्शित केला. 1983 च्या विश्वचषकादरम्यान कपिल देव (Kapil Dev) यांनी झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 175 धावांची खेळी केली होती, तेव्हा टीव्ही तंत्रज्ञांच्या संपामुळे त्या सामन्याचे कोणतेही व्हिडिओ फुटेज उपलब्ध नव्हते. क्रिकेट चाहत्यांना या सामन्याचा रोमांच अनुभवता आला नव्हता. परंतु आता 5G वर पुन्हा कपिल देव यांच्या त्या खेळीचा आनंद घेता येणार आहे.
दरम्यान, इमर्सिव्ह व्हिडिओ तंत्रज्ञानाद्वारे, एअरटेलने 4K मोडमध्ये ‘175 रिप्लेड’ पुन्हा तयार केले असून ज्यामुळे युजर्सना कपिल देव या आयकॉनिक क्रिकेटरच्या इनिंगचा पुन्हा अनुभव घेता येणार आहे. 50 हून अधिक वापरकर्त्यांनी एअरटेल 5G चाचणी नेटवर्कशी कनेक्ट केलेल्या 5G स्मार्टफोन्सवर हा आनंद घेतला. 1Gbps पेक्षा जास्त वेग आणि 20 मिलीसेकंदांपेक्षा कमी विलंब मिळवण्याबरोबरच, त्यांच्याकडे कॅमेरा अँगल, 360-डिग्री इन-स्टेडियम व्ह्यू, शॉट स्टॅट्स आणि विश्लेषणाचा रिअल-टाइम ऍक्सेस आहे.
कपिल देव आपला अनुभाव सांगताना म्हणाले, मी 5G तंत्रज्ञानाच्या क्रांतीने आश्चर्यचकित झालो आहे आणि माझा डिजिटल अवतार माझ्या चाहत्यांशी संवाद साधताना पाहून जणू मी तिथेच त्यांच्यासोबत असल्याचा अनुभव घेतला. धन्यवाद, एअरटेल. या अप्रतिम प्रयत्नाबद्दल आणि माझ्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या खेळीपैकी एक जिवंत केल्याबद्दल मी आभारी आहे.