स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. दर्जेदार संहिता, दमदार कलाकारांची फौज आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन यामुळेच स्टार प्रवाहवरील मालिकांमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग बनलं आहे. स्टार प्रवाहच्या या परिवारात लवकरच आणखी एका नव्या मालिकेचं कुटुंब सामील होणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘तुझेच मी गीत गात आहे’. गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे तब्बल १२ वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना उर्मिला म्हणाली, “खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहसोबत आणि अर्थातच स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांच्यासोबत खूप जुनं नातं आहे. वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येतेय. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका मी आवर्जून पाहते. नायिका म्हणून या प्रवाहात आता मी देखिल सामील होणार आहे त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे.”
‘कुल्फी कुमार बाजेवाला’ या हिंदी मालिकेचं हे मराठी व्हर्जन असल्याचं म्हटलं जात आहे. मालिकेचा प्रोमो उर्मिलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या भूमिकेविषयी चाहत्यांनी उत्सुकता व्यक्त केली आहे. ही नवी मालिका येत्या 2 मे पासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.