सध्या शेतशिवारात रब्बी हंगामाची लगबग सुरु असली तरी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 11 व्या हप्त्याचेही वेध लागलेले आहेत. यंदा वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने या योजनेचा 10 हप्ता 10 कोटी 99 लाख 68 हजार 686 (Farmer) शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला होता. असे असले तरी या हप्त्याला 1 महिन्याचा उशिर झाला होता. पण 11 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना अधिकची वाट पहावी लागणार नाही. कारण 11 वा हप्ता जमा करण्याची तयारी सुरु झाली आहे. सध्या पीक काढणीची गडबड आणि आगामी खरिपात शेतकऱ्यांची गरज ओळखून 15 एप्रिलपर्यंत या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे.
याकरिता 20 हजार कोटी खात्यावर वर्ग केले जाणार आहेत तर योजनेचा आतापर्यंतचा खर्च हा 2 लाख कोटींच्या घऱात जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खत्यात थेट पैसे जमा करणारी ही पहिलीच योजना आहे. शिवाय कोणता मध्यस्ती नाही, कोणते कमिशन नाही अशा पध्दतीने ही योजना देशात सुरु आहे. अन्यथा यापूर्वी भ्रष्ट नेते आणि शासकीय कर्मचारी हेच योजनेची वाट लावत होते. यावर आता अंकूश आला असून अत्यंत अल्पभुधारक शेतकऱ्यास देखील योजनेचा लाभ मिळत आहे.
अनेक शेतकरी हे विविध कारणांमुळे अद्यापही योजनेपासून दूर आहेत. तर बोगस असे योजनेचा लाभ घेत आहेत. याची पडताळणीचे काम सुरु असून ज्यांनी पात्रता नसतानाही लाभ घेतलेला आहे अशांना पहिल्या हप्त्यापासून ही रक्कम केंद्र सरकारला परत करावी लागणार आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा महसूलच्या कर्मचाऱ्यांकडे ही रक्कम द्यावी लागणार आहे. जर कुणाला नव्याने सहभाग नोंदवायचा असेल तर मात्र, महसूल विभागाकडे अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये अर्ज करताना बँक खाते,आधार आणि महसूल नोंदी व्यवस्थित भरा. एकाच लागवडीयोग्य जमिनीच्या नोंदीत एकापेक्षा जास्त प्रौढ सभासदांची नावे नोंदवल्यास या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रौढ व्यक्ती स्वतंत्रपणे लाभासाठी पात्र ठरणार आहे. काही अडचण आल्यास शेतकऱ्यांना(155261 किंवा 011-24300606) या हेल्पलाइनवर क्रमांकावर संपर्क साधता येईल.
पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लाभार्थ्यांना e-KYC हे करावे लागणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 31 मार्चपर्य़ंतची मुदत देण्यात आली होती. पण शेतकऱ्यांचा प्रतिसादच नव्हता. त्यामुळे e-KYC केल्याशिवाय 11 हप्ता मिळणार नाही असे धोरण ठरविवण्यात आले होते. पण आता यामध्ये वाढ करण्यात आली असून शेतकऱ्यांना 22 मे पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. पीएम किसान योजना अनौपचारिकपणे 1 डिसेंबर 2018 रोजी सुरू करण्यात आली होती.आता या योजनेचा 11 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहे.