ताजी बातमी ऑनलाईन टीम
येथील गणपती पेठेत विष्णू श्रीधर साने यांच्या रंगाच्या दुकानाला मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे आग लागली. तसेच माधवनगर (ता. मिरज) येथील रविवार पेठेत असलेल्या चप्पलच्या गोदामाला मध्यरात्रीनंतर आग लागली. आगीच्या या दोन्ही घटनांमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले.
सांगली येथील गणपती पेठेत साने यांच्या रंगाच्या दुकानाला बुधवारी रात्री शॉर्टसर्किने आग लागली. यामध्ये सर्व साहित्य तसेच मागील बाजूस असलेल्या त्यांच्याच घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. फिर्याद साने यांनी येथील सांगली शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
मध्यरात्री रंगाच्या दुकानातून आगीचे आणि धुराचे लोट बाहेर येऊ लागले. आगीने रौद्ररूप धारण केल्यानंतर महापालिका अग्निशमन विभागाचे पथक आणि पोलिस दाखल झाले. तीन बंब व 10 जवानांच्या मदतीने दोन तासाच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
माधवनगर येथील रविवार पेठेत असलेल्या चप्पलच्या गोदामाला मध्यरात्रीनंतर आग लागली. त्यात गोडाऊनध्ये असलेला सर्व माल जळून खाक झाला. महापालिका व तासगाव नगरपालिकेच्या 10 गाड्यांनी तीन ते चार तासात अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
आगीमध्ये प्राथमिक तपासात लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. गांधीनगर (कोल्हापूर) येथे राहणारे अनिल दयाराम मखिजा यांची भारत सेल्स कार्पोरेशन नावाची ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनीकडे चप्पलची एजन्सी आहे. माल ठेवण्यासाठी श्री. मखिजा यांनी माधवनगर येथील रविवार पेठेतील प्रशस्त गोदाम भाड्याने घेतले आहे. ते बुधवारी काम आटोपल्यानंतर गोदाम बंद करून ते गावी निघून गेले.
मध्यरात्रीनंतर सुमारास अचानक त्या गोदामातून धूर आणि आगीचे लोट उठू लागले. सुरक्षा रक्षकाने आरडाओरडा करून शेजारील लोकांना जागे केले. संजयनगर पोलिस ठाणे आणि महापालिका अग्निशमन दलाला माहिती कळवली. महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांच्या पथकाने दलाने आग आटोक्यात आणली. तासगाव नगरपालिका अग्निशमन दलाची गाडी बोलवण्यात आली. या आगीत गोदामातील लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला.