जिल्ह्याला शुक्रवारी दुपारी वळवाचा जोरदार तडाखा बसला. अचानक आलेल्या पावसाने ठिकठिकाणी हानी पोहोचवली. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, झाडे उन्मळून पडली. खटाव तालुक्यात गारपिटीने अतोनात नुकसान झाले. जावली तालुक्यातील रायगाव येथे शेतात काम करणार्या प्रतीक्षा अमर बगाडे (वय 28) यांच्या अंगावर वीज पडून त्या मयत झाल्या. नेरमध्ये वीज पडून शेळ्या ठार झाल्या तर कोरेगाव तालुक्यात उसाचा फड पेटला. सातार्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर ‘अस्मान’ कोसळून पडझड झाली.
जिल्ह्यात सातारा, खटाव, कोरेगाव, कराड, पाटण तालुक्याला अवकाळीने दणका दिला.
शुक्रवारी दुपारी 4 च्या दरम्यान अचानक पावसाने हजेरी लावली. वीजांच्या कडकडाटातच पावसाने सुरुवात केली. पाऊण तास पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पावसाबरोबरच तुफान वार्यामुळे अनेक ठिकाणी नुकसानीच्या घटनाघडल्या. सातारा शहरात जोरदार वार्यामुळे अनेक ठिकाणी झाडे व जाहिरात फलक कोसळले. जिल्हा क्रीडा संकुलात सुरू असणार्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतही पावसाने अडथळा आणला. खटाव तालुक्यात गारपीट झाल्याने शेतकर्यांचे नुकसान झाले. तालुक्याच्या अनेक भागात गारांचा पाऊस सुरू होता. सोसायट्याच्या वार्यामुळे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. तर नेरमध्ये वीज पडून दोन शेळ्या ठार झाल्या. कोरेगाव तालुक्यातील शिरंबे येथे वीज पडल्याने उसाचा फड पेटला.
मात्र, जोरदार पावसामुळे मोठा अनर्थ टळला. कराड तालुक्यातही सोसायट्याच्या वार्यामुळे पडझड झाली. वार्यामुळे अनेक तालुक्यात ऊस तोड कामगारांच्या झोपड्यांचे नुकसान झाले. त्यामुळे मजुरांची चांगलीच तारांबळ उडाली.