ताजी बातमी ऑनलाइन टीम
शरद पवारांच्या घराजवळ आंदोलन करण्याआधी त्यांच्या घराची एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने रेकी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही गोष्ट या परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून समोर आली आहे. सर्व आरोपींचे मोबाईल या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांनी जप्त केले असून त्याचा तपास आता केला जात आहे.
याबाबत मुंबई पोलिसांचे असे म्हणणे आहे की शरद पवारांच्या घराजवळ केलेले आंदोलन हा सर्व मोठा कट होता. त्यामुळे या परिसराची आधी रेकी केली होती. या परिसरातील आणि आझाद मैदानातील काही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. गुन्हे नोंद करण्यात आलेल्या 109 लोकांपैकी काही लोकांची हालचाल ही शरद पवारांच्या निवासस्थानाच्या परिसरात आधीच दिसून आली होती.
विशेष म्हणजे काही लोकांची या परिसरातील गाड्यांमध्ये संशयास्पद हालचाल दिसून आली आहे. पोलीस याचा तपास करत आहेत.
काल, शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने आंदोलन केले. पवारांच्या घराच्या परिसरात आंदोलक आले असताना त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचारी हे थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश घेतला आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केल्याचे समोर आले. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून त्याचा तपास सुरू केला आहे.