एक माथेफिरूने पत्नी-मुलाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे ही घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या डोक्यात कुदळ घालून तिला ठार मारले. नंतर पाच वर्षाच्या मुलाला गळफास देऊन त्याची हत्या केली. एवढं करून माथेफिरू थांबला नाही. त्याने पत्नी मुलाच्या हत्येचा मोबाईलमध्ये व्हिडिओ केला आणि तो मेहुण्याला पाठवला. नंतर घर पेटवून दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, बलराज दत्तात्रय कुदळे (वय-35) असे मारेकऱ्याचं नाव आहे. मारेकरी ट्रकचालक असल्याचे समजते. तर अक्षदा (वय-28) आणि शिवतेज (वय-5) असे मृत मायलेकाची नावे आहेत. बलराज हा पती, मुलासोबत श्रीरामपूर तालुक्यातील दिघी येथे शेतात राहत होता. बलराज आणि त्याच्या पत्नीचे गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. पतीच्या दररोजच्या कटकटीला कंटाळून अक्षदा तिच्या मुलासह माहेरी निघून गेली होती. परंतु माहेरच्या मंडळीने तिची समजूत काढून तिला पुन्हा सासरी पाठवले होते.
रामनवमीच्या दिवशी बलराज आणि अक्षदामध्ये पुन्हा वाद झाले. वाद विकोपाला जाऊन बलराजने पत्नीच्या डोक्यात कुदळ घातली. घाव इतका जबदस्त होता, की अक्षदाचा जागेवरच मृत्यू झाला. बलराज एवढं करूनही थांबला नाही. त्याने पोटचा मुलगा शिवतेज याला घराजवळ असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास देऊन ठार मारले.
बलराज याने पत्नी आणि मुलाची हत्या करून सर्व घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं. व्हिडिओ त्याचा मेहुणा आणि गावातील काही लोकांना पाठलला. बलराजचा मेहुणा पुण्यातील चाकण येथे राहतो. बलराज यांनी त्याला व्हिडिओ कॉल करून पत्नी आणि मुलाचे मृतदेह दाखवले. तुझ्या बहिणीला आणि भाच्याला ठार मारले आहे, आता मयताला ये, असा मेसेज देऊन फोन कट केल्याची माहिती मिळाली आहे.
या दुहेरी हत्याकांडाने अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. घटनेनंतर अक्षदाचे नातेवाईक आणि गावकरी संतापले आहेत. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.