आंध्रप्रदेशमध्ये बुधवारी रात्री मोठी दुर्घटना घडली आहे. एका केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये होरपळून सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आंध्रप्रदेशमधील वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील अक्कीरेड्डीगुडेममध्ये ही दुर्घटना घडली आहे. या आगीमध्ये 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांना तात्काळ विजयवाडा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा अक्कीरेड्डीगुडेममधील पोरस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड या केमिकल मॅन्युफॅक्चरिंग यूनिटमध्ये भीषण आग लागली. या आगीमध्ये केमिकल कंपनीचे दोन मजले जळून खाक झाले आहेत. या ठिकाणी 18 कर्मचारी काम करत होते. आगीची घटना घडली त्यावेळी सर्वजण कंपनीमध्ये उपस्थित होते. या आगीत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर विजयवाडा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या आगीमध्ये मृत्यू आणि जखमी झालेले जास्तीत जास्त कामगार हे बिहारचे असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व कामगार नाईट शिफ्टमध्ये काम करत असताना ही मोठी दुर्घटना घडली.
वेस्ट गोदावरी जिल्ह्यातील एसपी राहुल देव शर्मा यांनी सांगितलं की, पोरस केमिकल कंपनीमध्ये (Fire in Chemical Manufacturing Unit) बुधवारी रात्री आग लागली. या कंपनीमध्ये पॉलिमर तयार केले जात होते. या कंपनीला आग कशी लागली या मागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पण गॅस पाइप तुटल्याने किंवा गळती झाल्याने आग लागली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरा या आगीवर नियंत्रण मिळवले. पण आगीमध्ये कपंनीचे दोन मजले जळून खाक झाले आणि सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेप्रकरणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख रुपये, गंभीर जखमींना 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.