गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परीणाम झाला आहे. दोन वर्षांत सर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. पण आता हळूहळू सर्वकाही सुरळीत झाले असून कॉलेज देखील सुरु झाले आहेत. त्यामुळे यावर्षी परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. येत्या मे महिन्यात राज्यातील विविध विद्यापीठांच्या ऑफलाईन परीक्षा हेणार आहेत. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रतितास 15 मिनिटांचा वाढीव वेळ देण्यात येणार आहे.
बुधवारी परीक्षासंदर्भात कुलगुरुंची बैठक झाली. या बैठकीमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Higher and Technical Education Minister Uday Samant) यांनी हा निर्णय जाहीर केला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षा देताना प्रतितास 15 मिनिटं अधिकचा वेळ मिळणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन लिखाणाचा सराव राहिला नाही. त्यामुळे लेखी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना जास्त वेळ देण्यात यावा, अशी मागणी युवासेनेच्यावतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे करण्यात आली होती. युवासेनेकडून करण्यात आलेल्या मागणीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी कुलकरुंसोबत बैठक घेत विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेतला. उदय सामंत यांच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
बुधवारी झालेल्या कुलगुरुंच्या बैठकीत ऑफलाईन परीक्षांसाठी प्रतितास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर मुंबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2022 मध्ये होणाऱ्या ऑफलाईन प्रथम सत्र उन्हाळी परीक्षेसाठी वेळ वाढविण्यासंदर्भात परिपत्रक सुद्धा जारी केले आहे. दरम्यान, कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण कॉलेजमधून थेट मोबाईल आणि टॅबवर आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची हातामध्ये पेन घ्यायची सवयी तुटली होती. त्यांचा लिखाणाचा सराव सुद्धा कमी झाला होता. अशामध्ये विद्यार्थ्याना वेळेमध्ये पेपर सोडवून होईल की नाही यांचे टेन्शन आले होते. पण आता त्यांना प्रतितास 15 मिनिटे वाढीव वेळ मिळणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.