येवला शहरातील मालेगाव रोड भागात असलेल्या बाजीराव नगर मध्ये गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास कौटुंबिक वादातून गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात पती ठार झाला आहे, तर त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
पाटबंधारे विभागात कॅनल इनस्पेक्टर म्हणून कार्यरत असलेला किरण आनंदा दुकळे याने आपल्या पत्नीवर गोळीबार करीत गंभीर जखमी करून नंतर स्वतःवर गोळी झाडली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. जखमी वैशाली दुकळे हिला अधिक उपचारासाठी नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान सरकारी कर्मचारी असलेल्या व्यक्तीकडे पिस्तूल आले कुठून याचा पोलीस कसोशीने तपास करीत आहे. दरम्यान या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येत पाहणी करीत तपासाच्या गती साठी प्रयत्न सुरू केले आहे.