Monday, December 23, 2024
Homeमहाराष्ट्रया जिल्ह्यात 118 गावांत पाणीटंचाई जाणवणार

या जिल्ह्यात 118 गावांत पाणीटंचाई जाणवणार


सातारा जिल्ह्यात एप्रिल ते जून महिन्याचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केला आहे. यात जिल्ह्यातील 118 गावे व 228 वाड्यावस्त्यांचा समावेश असून 1 कोटी 22 लाख 22 हजार रुपयांचा कृती आराखडा बनवला आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची दाहकता जिल्ह्यात जाणवू लागली आहे. सूर्य आग ओकतोय… अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मात्र, अजूनही दुष्काळी तालुक्यातील गावांमधून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी झाली नाही. कारण येथे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. येथे भूजल पातळी समाधानकारक आहे. तरीही जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सर्वच तालुक्यातील गावांची पाहणी केली आहे. दि. 1 एप्रिल ते 30 जून अखेर संभाव्य पाणी टंचाई आराखडा बनवण्यात आला आहे. माणमधील 16 गावे व 59 वाड्यांमध्ये 16 टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी 14 लाख 40 हजार रुपये खर्च येणार आहे.

खटाव तालुक्यातील 12 गावे व 16 वाड्यांमध्ये 7 टँकरने पाणी पुरवठा करणे व 11 खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी 10 लाख 26 हजार रुपये खर्च येणार आहे. कोरेगाव तालुक्यातील 4 गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी, 4 खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी 1 लाख 44 हजार रुपये खर्च येणार आहे. खंडाळा तालुक्यातील 5 गावे व एका वाडीत 6 टँकरने पाणी पुरवठा करणे व 2 खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी 6 लाख 12 हजार रुपये खर्च येणार आहे. फलटण तालुक्यातील 11 गावे व एका वाडीत 12 टँकरने पाणी पुरवठा करणे व 7 खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी 13 लाख 32 हजार रुपये खर्च येणार आहे. वाई तालुक्यातील 23 गावे व 17 वाड्यांत 14 टँकरने पाणी पुरवठा करणे व 30 खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी 23 लाख 40 हजार रुपये खर्च येणार आहे.

पाटण तालुक्यातील 19 गावे व 13 वाड्यांत 21 टँकरने पाणी पुरवठा करणे व 3 खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी 19 लाख 98 हजार रुपये खर्च येणार आहे. जावली तालुक्यातील 4 गावे व 12 वाड्यांमध्ये 15 टँकरने पाणी पुरवठा करणे व 1 खासगी विहीर अधिग्रहण करण्यासाठी 13 लाख 86 हजार रुपये खर्च येणार आहे. महाबळेश्वार तालुक्यातील 4 गावांना 4 टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी 3 लाख 60 हजार रुपये खर्च येणार आहे. सातारा तालुक्यातील 6 गावे व 8 वाड्यांमध्ये 11 टँकरने पाणी पुरवठा करणे व 3 खासगी विहिरी अधिग्रहण करण्यासाठी 10 लाख 98 हजार रुपये खर्च येणार आहे. कराड तालुक्यातील 7 गावे व एका वाडीत 5 टँकरने पाणी पुरवठा करणे व 1 खासगी विहीर अधिग्रहण करण्यासाठी 4 लाख 86 हजार रुपये संभाव्य खर्च येणार आहे, अशी माहिती या आराखड्यातून स्पष्ट झाली आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील गावांचा पाणी पुरवठा विभागामार्फत सर्व्हे करण्यात आला आहे. जूनअखेर जिल्ह्यातील गावे व वाड्यावस्त्यांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. गावाकडून टँकरची मागणी आल्यास त्या ठिकाणी टँकर पुरवण्यात येणार आहेत. तसेच ज्या गावात पाणी टंचाई जाणवते त्या गावात जलजीवन मिशन अंतर्गत प्राधान्याने कामे केली जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -