कडक उन्हाळ्यात गेल्या आठवड्यापासून शिराळा बसस्थानकात वीज व पाणी नसल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. वीज नसल्याने बसस्थानकात अंधार पसरला आहे.
बसस्थानकामधील पाण्याची टाकी उंचावर असल्यामुळे विद्युत मोटारीशिवाय टाकीत पाणी भरता येत नाही. त्यामुळे आठ दिवस झाले बसस्थानकात पाणी नाही.
आगार व्यवस्थापक विद्या कदम म्हणाल्या, वीज वितरण कंपनीचे बिलही वेळेवर भरलेले आहे. वीजवितरण कंपनीस वारंवार तक्रारी करूनही कर्मचारी फिरकलेले नाहीत. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात कर्मचारी व ग्रामस्थांचे हाल होत आहेत. तहसीलदार गणेश शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे.
याबाबत वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता पी. एम. बुचडे म्हणाले, बसस्थानकामध्ये झाडे वाढलेली आहेत. वारंवार सांगूनही तिथल्या कर्मचार्यां कडून फांद्या तोडल्या जात नाहीत. तसेच ज्या ठेकेदाराने गेल्या आठवड्यापूर्वी तिथल्या विद्युत पुरवठ्याचा पोल उभा केला आहे. त्या ठेकेदाराचा कामगार टोलवरून पडल्याने त्याचे कर्मचारी कामावर आलेले नाहीत. त्यामुळे कामगार कमी आहेत. लवकरच काम पूर्ण केले जाईल.