सर्वोच्च न्यायालय आणि शासनानाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील निकालामध्ये बैलगाडा शर्यतीवरील निर्बंध काहीसे शिथील करत बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी दिली होती.
बैलगाडा शर्यतीसाठी शासनाकडून कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय यांच्या अधिसूचनेनुसार बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांसाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. एकीकडे सर्वत्र यात्रा-जत्रांमध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्याची घाई दिसत आहे. दुसरी बाजू पाहता, प्राण्यांच्या सुरक्षिततेची योग्य उपाययोजना नसल्याने व इतर कारणांनी शर्यतीत अनेक अपघात घडले. यामुळे आता नवीन नियमावली जाहीर झाली असून बैलगाडा शर्यतीत नेमके काय नियम पाळावे लागतील हे स्पष्ट केलं गेलं आहे.
नवीन नियमावलीनुसार, बैलगाडा शर्यत आयोजित करण्यासाठी पंधरा दिवस अगोदर शर्यतीसाठी परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच बैलांचा छळ करण्यास मनाई असणार आहे, तसेच बैलांना उत्तेजक द्रव्य देण्यावर सुद्धा मनाई घालण्यात आली असून या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
बैलगाडा शर्यतीसाठी नियमावली:
▪️ बैलाच्या वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र गरजेचं आहे.
▪️ ठरलेल्या गाडीवानालाच सहभागी होण्याची परवानगी.
▪️ शर्यतीसाठी योग्य धावपट्टी वापरण्यात यावी.
▪️ स्पर्धेतील सहभागी बैलाचे छायाचित्र काढून ठेवावे.
▪️ ठरलेल्या गाडीवानास ओळखपत्र.
▪️ बैलगाडा शर्यतीस केवळ एक हजार मीटर अंतराच्या अटीवर परवानगी.
▪️ शर्यत सुरू झाल्यावर बैलावर काठी, चाबूक आणि इतर कोणत्याही प्रकारच्या वस्तूंचा वापर करण्यावर मनाई.
▪️ शर्यतीदरम्यान बैलांना कोणतेही उत्तेजक औषधी किंवा मादक द्रव्य देण्यास बंदी असेल.
▪️ शर्यतीवेळी त्या ठिकाणी पशु रुग्णवाहिका असणं आवश्यक.
▪️ बैलगाडा शर्यतीचे संपूर्ण चित्रीकरण करून ते उप-विभागीय अधिकाऱ्यास सादर करणे अनिवार्य.
▪️ शर्यत जिंकण्यासाठी कोणत्या बेकायदेशीर कृत्याचा अवलंब झाल्यास किंवा वरील कोणत्या नियमांचा भंग झाल्यास अनामत रकमेच्या जप्तीसह कडक कारवाई केली जाईल.