कोल्हापुरात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची जाहीर संकल्प सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यभर काढलेल्या परिवार संवाद यात्रेची सांगता येथील तपोवन मैदानावर सायंकाळी पाच वाजता या संकल्प सभेने होणार आहे. या सभेच्या माध्यमातून शरद पवार कोल्हापुरातून विरोधकांना करारा जवाब देणार आहेत. या सभेला राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळींसह मंत्री, खासदार, आमदार व कार्यकर्तेही उपस्थित राहणार आहेत.
सभेच्या तयारीचा आढावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पवार, माजी स्थायी समिती सभापती राजेश लाटकर, माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास, विनायक फाळके, उत्तम कोराने आदी प्रमुखांनी घेतला आहे.
‘एक लाखाहून अधिक उपस्थिती…’
या सभेला जिल्हाभरातून एक लाखाहून अधिक कार्यकर्त्यांची उपस्थिती असेल, अशी माहिती निमंत्रक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. यामध्ये महिलांची उपस्थिती ही मोठ्या संख्येने असणार आहे. कोल्हापुरातील ही सभा गर्दीचा विक्रम नोंदवेल, असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला.