Monday, July 28, 2025
Homeमहाराष्ट्रराजगडावर मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला ; दरीत कोसळून महिला गंभीर

राजगडावर मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला ; दरीत कोसळून महिला गंभीर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

राजगड किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी तुफान हल्ला केला. मधमाश्यांपासून जीव वाचविण्यासाठी सैरावैरा धावत असताना गडाच्या बुरुजावरून खोल दरीत कोसळून रोहिणी सागर वराट (वय २५, रा. वाकड, पुणे) ही महिला गंभीर जखमी झाली. मधमाश्यांच्या हल्ल्यात महिलेच्या पतीसह दहा पर्यटक जखमी झाले. जखमींत वाकड, पुणे व बेळगाव येथील पर्यटकांचा समावेश आहे.


रोहिणी यांना अतिदुर्गम खोल दरीतून बाहेर काढून बांबूच्या झोळीतून गडाच्या पायथ्याला आणण्यासाठी गडाचे पाहरेकरी, स्थानिक युवक तसेच पोलिसांनी अक्षरशः प्राणांची बाजी लावली. ही दुर्घटना शनिवारी (दि. २३) सकाळी साडेदहाच्या सुमारास राजगड किल्ल्याच्या सुवेळा माचीवर घडली. रोहिणी यांच्या डोक्याला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना नसरापूर येथील खासगी रूग्णालयामध्ये दाखल केले आहे.



रोहिणी, त्यांचे पती सागार दिनेश वराट, मावस दीर अक्षय मधुकर पवार, भाचा यश बापूराव घागरे असे चौघे शुक्रवारी (दि. २२) राजगडावर मुक्कामी आले होते. शनिवारी सकाळी सर्वजण फिरण्यासाठी राजगडाच्या माचीवर गेले. बालेकिल्ल्याच्या खालच्या बाजूने सुवेळा माचीवरून माघारी पद्मावती माचीकडे रोहिणी यांच्यासह त्यांचे पती, नातेवाईक जात होते. त्यावेळी बेळगाव येथील आठ-दहा पर्यटकही बालेकिल्ल्याकडे चालले होते. त्या वेळी तेथील एका कड्यावरील पोळ्यातील मधमाश्यांनी पर्यटकांवर तुफान हल्ला केला. मधमाश्यांनी रोहिणी, सागर व इतर पर्यटकांचा चावा घेतला. जिवाच्या आकांताने सर्वजण जोरदार ओरडू लागले. सैरावैरा धावताना कड्याजवळील तटबंदीवरून रोहिणी या जवळपास दोनशे फूट खोल दरीत कोसळल्या. मधमाश्यांच्या हल्ल्यात त्यांचे पती गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच गडावरील पुरातत्त्व खात्याचे पहारेकरी बापू साबळे, सुरक्षा रक्षक अक्षय कचरे, विशाल पिलावरे, दीपक पिलावरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. खोल दरीत उतरून रोहणी यांना अलगद बाहेर काढले. नंतर तेथून बांबूच्या झोळीत घालून कडे-कपाऱ्यातून गडाच्या पायथ्याला आणले. तोपर्यंत तेथे सरकारी रुग्णवाहिकेसह डॉ. राहुल बोरसे पाटील, वेल्हे पोलीस ठाण्याचे औदुंबर आडवाल, ज्ञानेश्वर शेडगे, ज्ञानेश्वर दिवार, वैजनाथ घुमरे यांचे पथक दाखल झाले. प्रकृती अत्यवस्थ झाल्याने रुग्णवाहिकेतून रोहिणी यांना नसरापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -