ताजी बातमी ऑनलाईन टीम
लोकेश राहुलची कर्णधाराची खेळी आणि सर्वच गोलंदाजांचा धारदार मारा यांच्या बळावर लखनौने (LSGvsMI) रविवारी मुंबई इंडियन्सला 36 धावांनी धूळ चारली. मुंबईने अशा प्रकारे आपल्या पराभवांची अष्टमी पूर्ण केली. त्यांची पाटी कोरीच आहे. पाच विजय संपादलेल्या लखनौचे आता आठ सामन्यांतून 10 गुण झाले आहेत.
नाणेफेक जिंकलेल्या लखनौने मुंबईपुढे विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य ठेवले होते. ते त्यांना पेलवले नाही. त्यांना निर्धारित 20 षटकांत 8 बाद 132 धावांपर्यंतच मजल मारता आली. कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी 49 धावांची सलामी दिली. किशनने 8 धावा केल्या. डेवाल्ड ब्रेविस हाही 3 धावा करून तंबूत परतला. मोहसीन खानने त्याला टिपले. कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूंत 39 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि एक षटकार लगावला. त्याला कृणाल पंड्याने तंबूत पाठवले.
पाठोपाठ सात धावा करून सुर्यकुमार यादव हाही बाद झाला. त्यानंतर कायरान पोलार्ड आणि तिलक वर्मा यांनी सामन्यात रंग भरले. मात्र वर्माला 38 धावांवर जेसन होल्डरने तंबूत पाठवले. पोलार्डने 19 धावा करून तंबूत परतला. मग डॅनियल सॅम्सही बाद झाला. आता लखनौचा विजय ही केवळ औपचारिकता उरली होती. झालेही तसेच आणि मुंबईच्या गोटात निराशेचे ढग जमा झाले. लखनौकडून कृणाल पंड्याने 3, मोहसीन खान, रवी बिश्नोई व आयुष बदोनी यांनी प्रत्येकी 1 मोहरा टिपला.