अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना रविवारी कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर रवी राणा यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगामध्ये तर त्यांची पत्नी नवनीत कौर राणा यांची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली. पण भायखळा तुरुंगामध्ये (Byculla jail) जाताच नवनीत कौर राणा यांची प्रकृती खालवल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्यांच्यावर भायखळा तुरुंगातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
आमदार रवी राणा यांना आधी पोलिसांनी आर्थर रोड तुरुंगात घेऊन गेले. पण नंतर कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर रवी राणा यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहामध्ये हलवण्यात आले. आर्थर रोड तुरुंगामध्ये एकूण 800 कैद्यांची क्षमता आहे. पण या तुरुंगात सध्या क्षमतेपेक्षा जास्त म्हणजेच 3,600 पेक्षा अधिक कैदी आहेत. राणा दाम्पत्यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कडेकोट पोलिस बंदोबस्तात त्यांना तुरुंगात आण्यात आले. दरम्यान रवी राणा यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.
सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केल्यामुळे नवनीत कौर राणा आणि रवी राणा यांना खार पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर रविवारी त्यांना वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. तर कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर राणा दाम्पत्यांची कोरोना तपासणी करण्यात आली तर त्याचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली. रवी राणा यांना आधी आर्थर रोड तुरुंगात नेण्यात आले नंतर तळोजा कारागृहामध्ये हलवण्यात आले. तर नवनीत कौर राणा यांची रवानगी भायखळा कारागृहामध्ये करण्यात आली. याप्रकरणाची पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी होणार आहे.
दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या घोषणेनंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते. त्यांनी रवी राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने करत आंदोलन केले. त्यानंतर राणा दाम्पत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात अडथळा येऊ नये यासाठी आपले आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. पण त्यानंतर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी खार पोलिसांनी दोघांना अटक केली. सध्या दोघेही तुरुंगात आहेत.