सोलापूर – हैदराबाद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आज (सोमवार) दुपारी भीषण अपघात झाला. यात तीन जण जागीच ठार झाले. तर अन्य काही जण गंभीर जखमी आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, (एमएच क्यू डब्लू 9587) हा माल वाहतूक ट्रक थांबला होता. या ट्रकला पाठीमागून भरधाव आलेल्या इनोव्हा कारने जोराची धडक दिली. या भीषण अपघातात कारमधील चौघे जागीच ठार झाले. कारची धडक इतकी जोरदार होती की अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. कारचा दर्शनी भाग थेट ट्रकच्या खाली गेला आहे. क्रेन लावून कारला बाहेर ओढून काढले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. दरम्यान कारमधून सर्वजण सांगोला मार्गे बिदरकडे जात होते, अशी माहिती मिळत आहे. मयतामध्ये दोन महिला, एक पुरुष आणि एक लहान बाळाचा समावेश असल्याचे सिव्हिल हॉस्पिटलमधून सांगण्यात आले.