ताजी बातमी ऑनलाइन टीम
इशान किशन आयपीएल 2022 ऑक्शनमधील सर्वात महागडा खेळाडू होता. पाच वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनं त्याला 15 कोटी 25 लाख रूपयांना खरेदी केलं होतं. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये तो अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. रविवारी झालेल्या मॅचमध्ये लखनऊनं सुपर जायंट्सनं मुंबईचा 36 रननं पराभव केला. या मॅचमध्ये इशाननं 20 बॉलमध्ये फक्त 8 रन केले. इतकंच नाही तर या खेळीत त्याला एकही फोर लगावता आला नाही.
या मॅचनंतर ‘स्टार स्पोर्ट्स’वर कॉमेंट्री करताना माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगनं (Harbhajan Singh) इशानच्या बॅटींगवर प्रश्न उपस्थित केले. ‘इशान टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्सकडून आक्रमक बॅटींगसाठी ओळखला जातो. त्यामुळेच त्याला इतके पैसे मिळाले होते. पण, या पैशांमुळे तो बॅटींग करणेच विसरला आहे. 20 बॉलमध्ये 8 रन कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगले नाहीत. संपूर्ण सिझनमध्ये मुंबईला संघर्ष करता आलेला नाही. आता उरलेल्या मॅचमध्ये मुंबईनं झुंजार खेळ करावा लागले. कॅप्टन रोहित शर्माला याची जबाबदारी घ्यावी लागेल.’ हरभजन सिंग मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन असून त्याच्या कॅप्टनसीमध्ये मुंबईनं चॅम्पियन्स लीगचं विजेते्पद देखील मिळवले आहे.
सलग 6 इनिंगमध्ये फेल
लखनऊ सुपर जायंट्स विरूद्ध इशाननं फक्त 40 च्या स्ट्राईक रेटनं रन केले. टी20 क्रिकेटसाठी हा अतिशय खराब स्ट्राईक रेट आहे. मागील 6 इनिंगमध्ये त्यानं 100 पेक्षा कमी स्ट्राईक रेटनं रन केले आहेत. सीएसके विरूद्ध तो पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता. त्यापूर्वी लखनऊ विरूद्ध 17 बॉलमध्ये 13, पंजाब किंग्स विरूद्ध 6 बॉलमध्ये 3, आरसीबी विरूद्ध 28 बॉलमध्ये 26 आणि केकेआर विरूद्ध 21 बॉलमध्ये 14 रन त्यानं केले होते. त्याचा टी20 क्रिकेटमधील स्ट्राईक रेट 130 च्या आसपास आहे. पण, या सिझनमध्ये तो बराच खाली आला आहे.
इशान किशननं मागील 2 आयपीएल सिझनमध्ये दमदार बॅटींग केली होती. आयपीएल 2021 मध्ये त्यानं 10 इनिंगमध्ये 134 च्या स्ट्राईक रेटनं 241 रन केले होते. या कामगिरीच्या जोरावर त्याची टी20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात निवड झाली होती. तर आयपीएल 2020 मध्ये 14 इनिंगमध्ये 146 च्या स्ट्राईक रेटनं 516 रन केले होते. ही त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.