पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीनंतर भडकलेल्या महागाईमुळे नागरिक चांगलेच होरपळून निघाले आहेत. वाढत्या महागाईमुळे स्वयंपाक घरातील बजेट बिघडले असताना आता भाजीपाल्याचे दर कडाडले आहे. भाजीपाल्याच्या भावात वाढ होत असल्याने मुंबईकरांच्या खिशाला चटका बसत आहे. एकीकडे एलपीजी सिलिंडरचे भाव वाढत असताना आता भाज्याही महागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. इंधनांच्या वाढत्या दरामुळे वाहतूक खर्चावर परिणाम झाल्याने ही दरवाढ झाल्याचे दिसत आहे. त्यातच सध्या उन्हाळा सुरू असल्याने नागरिकांना हिरव्या पालेभाज्यांसाठी जादा पैसे मोजावे लागत आहे.
20 रुपयांत मिळतोय फक्त एक लिंबू
महागाईमुळे प्रत्येक घरात वापरण्यात येणाऱ्या लिंबाचे दर ( Lemon Price Hike ) देखील गगनाला भिडले आहेत. गेल्या 15 दिवसांपूर्वी 200 रुपये प्रतिकिलो मिळणारा लिंबू आता आणखी महागला आहे. वांद्रे येथील पाली मार्केटमध्ये एक लिंबू खरेदी करण्यासाठी 20 रुपये मोजावे लागत आहे. काही भागात लिंबू प्रति नग 15 रुपयेप्रमाणे विकला जात आहे. लिंबूची झालेली ही दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.
लिंबूला व्हिटॅमिन सीचा हा उत्तम स्रोत मानला जातो. त्यामुळे उन्हाळ्यात लिंबू आपल्याला हायड्रेट ठेवतो. तसेच पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी लिंबू उपयोगी ठरतो. त्यात सध्या उन्हाळा सुरु असल्याने लिंबाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दरवाढ झाल्याने लिंबाच्या खरेदीवर देखील परिणाम झाला आहे. बऱ्याच लोकांनी लिंबू खरेदी करणे कमी केले आहे. फक्त मोजकेच लोक सध्या लिंबू खरेदी करत आहे.
इतर भाजीपाला देखील महागला
मुंबईतील भाजी विक्रेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मिरचीचा दर 100 रुपये प्रतिकिलोवरून 160 ते 200 रुपयांवर पोहोचला आहे. हिरवे वाटणे 200 रुपये किलो झाले आहे. गजार 40 ते 60 रुपये किलोवरून 100 रुपयांवर पोहोचले आहे. चवळीच्या शेंगा 200 रुपये किलो तर पालक आणि कोथिंबीर आधी 10 रुपये जुड्या विकल्या जात होत्या आता त्या 20 रुपयांनी विकल्या जात आहे. यासह भेंडी, भोपळा, हिरवी मिरची आणि हिरव्या पालेभाज्या यांचे दर देखील दुप्पट झाले आहेत.
असे आहे भाव
– लिंबू – एक लिंबू प्रत्येकी 20 रुपये.
– मिरची – 160 ते 200 रुपये किलो.
– हिरवे वाटणे – 200 रुपये किलो.
– गाजर – 100 रुपये किलो.
– चवळीच्या शेंगा – 200 किलो.
– पालक – 20 रुपये जुडी.
– कोथिंबीर -20 रुपये जुडी.