कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली कात टाकत असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज झाला असून हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गुणतालिकेचा विचार केला तर तीन विजय मिळवून चेन्नईचा संघ नवव्या क्रमांकावर आहे. त्यांनी नऊ सामन्यांतून सहा पराभव आणि तीन विजय अशी कामगिरी बजावली आहे.
तथापि, 1 मे रोजी झालेल्या सामन्यात चेन्नईचा संघ मूळ रूपात दिसून आला. त्या लढतीत त्यांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 202 धावांचा डोंगर उभारला आणि सामना जिंकलासुद्धा. रवींद्र जडेजाकडून पुन्हा धोनीने कर्णधारपद स्वतःकडे घेतल्यानंतर चेन्नईच्या खेळाचा दर्जा उंचावत चालला आहे. त्यामुळे अजूनही त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची आशा बाळगता येते. जर त्यांनी यापुढचे सगळे सामने मोठ्या फरकाने जिंकले तर ही बाब शक्य आहे.
सलामीवीर ऋतुराज गायकवाड याला सापडलेला सूर ही चेन्नईची जमेची बाजू म्हटली पाहिजे. हैदराबादविरुद्ध त्याचे शतक केवळ एका धावेने हुकले. शिवाय वयाच्या चाळीशीतही धोनी आपली बॅट एखाद्या दांडपट्ट्यासारखी चालवतोय. चेन्नईला गोलंदाजीत मात्र विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. मुकेश चौधरी त्या दृष्टीने झकास कामगिरी बजावू शकतो. खेरीज त्याला माहीश तीक्शाना चांगली साथ देऊ शकतो. त्याची जादू चालली तर चेन्नईचे काम अधिक सोपे होऊ शकेल.
बेंगलोर संघाचा विचार केला तर फाफ डू प्लेसिसला कर्णधार या नात्याने स्वतः उत्तम फलंदाजी करावी लागणार आहे. विराट कोहलीला सूर सापडला ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे. ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद. अनुज रावत यांनाही तगडी फलंदाजी करावी लागेल. यापैकी कोणाच्याही फलंदाजीत सातत्य दिसलेले नाही. त्यामुळेच दहा सामन्यांपैकी पाच सामन्यांत बेंगलोरला हार स्वीकारावी लागली आहे. पाच विजय संपादून त्यांच्या खात्यात दहा गुण जमा झाले आहेत.
गोलंदाजीचा विचार केला तर जोश हेझलवूड, महम्मद सिराज, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा असे सरस गोलंदाज बेंगलोरच्या ताफ्यात आहेत. अनेक तारांकित खेळाडूंचा भरणा या चमूमध्ये दिसून येते. प्रश्न आहे तो प्रत्यक्ष मैदानावर त्यांची कामगिरी बहरण्याचा. आत्मविश्वास उंचावलेल्या चेन्नईला हा संघ कशी लढत देणार हे आपल्याला लवकरच दिसेल. त्यासाठी थोडी वाट पाहायला हवी.