नदीपात्रातील अडथळे हे महापुराच्या प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. त्याकडे दुर्लक्ष करून एका कृष्णा नदीवर शिरोळपासून पुढे पंधरा किलोमीटर अंतरावर पुलांची मालिका आकाराला येत आहे. यासाठी धरणसदृश भराव टाकण्यात आले आहेत. पुलांना कमानी करण्याच्या तज्ज्ञांच्या शिफारशीकडे साफ दुर्लक्ष केले आहे. परिणामी, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकाला महापुराचा आणखी धोका वाढला असल्याने पुलांचे बांधकाम रोखणारे आंदोलन शिरोळ तालुक्यामध्ये सुरू झाले आहे.
महाबळेश्वरपासून ते कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील काळमावडी या सर्वात मोठय़ा धरणातील पावसाचे आणि धरणातून सोडलेले पाणी हे शिरोळ तालुक्यामध्ये येत असते. कृष्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा या नद्यांचे (river) पाणी या तालुक्यामध्ये एकवटत असते. शिरोळ तालुका या पाण्याच्या बेसिनचा भाग बनला आहे. येथे पाणी तुंबून राहिल्यामुळे महापुराची तीव्रता वाढत आहे.
महापुराचे संकट वाढणार
शिरोळ तालुका संपल्यानंतर पुढे कर्नाटकचा भूभाग सुरू झाल्यावर कृष्णा नदीवर हिप्परगी बंधारा आहे. त्याही पुढे अलमट्टी हे प्रचंड धरण आकारले आहे. हिप्परगी बंधाऱ्या तसेच अलमट्टीची उंची वाढवण्याचे कर्नाटक शासनाचे नियोजन आहे. तज्ञांच्या एका गटाच्या मतानुसार हिप्परगी, अलमट्टी यांच्या जलसंचयाचा फटका शिरोळ, हातकणंगले, कागल या तालुक्यांना आणि पलीकडील सांगली जिल्ह्यातील काही गावांना आणखी वाढणार आहे. महापुराचे संकट, अडचणी वाढणार आहेत.
ग्रामस्थांना चिंता
दुसरीकडे शिरोळ तालुक्यापासून पुढे कृष्णा नदीपात्रात पुलांची मालिकाच आकारात येत नाही. सरासरी दोन किलोमीटर अंतराने पुलांचे महाकाय धूड उभारले जात असल्याने पूरग्रस्त ग्रामस्थांची धडकी भरली आहे. शिरोळच्या पुढे दक्षिणेकडे सरकू लागेल तसे १५ किलोमीटरच्या अंतरात डझनभर पूल आकाराला आले आहेत. वास्तविक पूल हे विकासाचा दुवा म्हणून ओळखले जाते. कृष्णा नदीसारख्या मोठय़ा नदीपात्रातून महाराष्ट्र -कर्नाटक राज्यातील हद्दीत जाण्यासाठी लांबचा वळसा घालण्यापेक्षा जवळचा पूल उपयुक्त ठरू शकतो. मात्र हे गणित पूरग्रस्त गावांना संकटात लोटणारे असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पूर परिषदेमध्ये कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती, सांगली व आंदोलन अंकुश यांच्या अभ्यासक, आंदोलनकर्त्यांनी याच मुद्दय़ांवर भर दिला. या मुद्दय़ावर प्रशासन स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही. अर्जुनवाड या राजू शेट्टी यांच्या गावातच हायब्रीड अमनेस्टी योजनेअंतर्गत सलगरेकडे जाणाऱ्या पुलाचे काम सुरू आहे. याबाबत खासदार धैर्यशील माने यांची जिल्हाधिकाऱ्यांशी दोन वेळा बैठक होऊनही कंत्राटदार कंपनी सूचनांना दाद देत नाही.
महापुरास पूल कारणीभूत असल्याचे चार वेळ्च्या महापुराने निदर्शनास आले आहे. तरीही ग्रामस्थ, शेतकरी यांच्या या मताला किंमत न देता पूल, बंधाऱ्यांची उंची वाढवण्याचा खटाटोप होत आहे. यामुळे शेतजमीन नष्ट होत चालली असल्याने विरोध होत आहे.
विकासाच्या नावाखाली महाराष्ट्र कर्नाटक शासन कृष्णा नदीवर (river) बांधत असलेल्या पुलांच्या परवानगीचा विषय वादग्रस्त आहे. शिरोळ तालुका बुडवणारे हे पूल असल्याने बांधकाम बंद ठेवण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. पूल बांधू नयेत; बांधल्यास नदीपात्रातील भराव दूर करण्याची शिफारस तज्ज्ञांनी केली असताना मोठे पूल बांधल्याने धरणसदृश भिंतीमुळे पुराचे पाणी तुंबून राहणार आहे. पुलांना कमानी करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने जनतेत राग आहे.