ताजी बातमी ऑनलाईन टीम
उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये शिकणाऱ्या मुलांना आता दररोज राष्ट्रगीत (national anthem) म्हणावे लागणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राज्यातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत दररोज म्हणणं अनिवार्य केले आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर मुस्लिम समाजाने आक्षेप घेतला आहे.
मदरशांमध्ये 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला राष्ट्रगीत (national anthem) गायलं जातं, मग ते रोज अनिवार्य करण्याची काय गरज आहे, असं मौलानांचं म्हणणं आहे. दुसरीकडे सरकारने हा निर्णय मुस्लिम समाजाच्या हिताचा असल्याचं सांगितलं आहे.
‘मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य
मदरशातील मुलांनी देशाच्या मुख्य प्रवाहात यावे आणि त्यांच्यात देशभक्तीची भावना वाढावी, यासाठी सकाळी अभ्यास सुरू होण्यापूर्वी इतर प्रार्थनेसह राष्ट्रगीत गाणे देखील बंधनकारक असेल, असा निर्णय योगी सरकारने घेतला आहे.
यूपी मदरसा बोर्डाचे अध्यक्ष डॉ. इफ्तिखार अहमद जावेद म्हणाले की, आजपासून राज्यात मदरसे सुरू झाले असून त्यांच्याकडे मुलं अभ्यासासाठी येऊ लागले आहेत. मदरशातील मुलं इतर सामान्य शाळेतील मुलांप्रमाणे दिसावीत आणि देश आणि जगात आपला ठसा उमटवता याव्यात यासाठी बोर्ड प्राधान्याने काम करत राहील.
धार्मिक शिक्षणासोबत आधुनिक शिक्षणही आवश्यक’
इफ्तिखार अहमद जावेद पुढे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात मुस्लिम मुलांच्या एका हातात कुराण आणि दुसऱ्या हातात संगणक असावा. मुस्लिम समाजाला पुढे नेण्याचा त्यांचा सकारात्मक विचार यातून दिसून येतो. हा विचार पुढे नेत आता नवीन सत्रापासून मदरशातील मुलांना धार्मिक शिक्षणाबरोबरच आधुनिक शिक्षणाची सक्ती केली जाईल अस बोर्डाने म्हटलं आहे. यासोबतच राष्ट्रवादाची भावना पुढे नेण्यासाठी ते दररोज राष्ट्रगीत गाणार आहेत.