ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथील जाहीर सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदूत्व, भाजप, राज ठाकरे आणि औवैसी अशी चौफेर फटकेबाजी करत ठाकरेंनी विरोधकांचा समाचार घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा उल्लेख करत मुंबईचा लचका तोडण्याचं काम सुरु आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तर बाबारी पाडल्याच्या वक्तव्यावरून देखील फडवीसांचा समाचार घेतला. तसेच मुन्नाभाईला चित्रपटात गांधीजी दिसतात, तसे एकाला बाळासाहेब दिसतात, भगवी शाल घालुन फिरतो असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना देखील टोला लगावला. हनुमान चालीसा, भोंगेवाले ए, बी, सी टीम आहे, असे यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
गदा पेलवणारा हिंदू हवा आहे”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलो, तुमच्या प्रमाणे मलाही आज मोकळं वाटतंय असं म्हणून केली. तसेच मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. आज शिवसैनिक गदा घेऊन उभा आहे मला असाच गदा पेलवणारा हिंदू हवा आहे, असे आवाहन शिवसैनिकांना केले. तसेच हिंदुत्व हे काय धोतर आहे का? कधी नेसले कधी सोडले? हिंदुत्व ही धरण्याची सोडण्याची गोष्ट आहे का? असा टोला विरोधकांना लगावला. तसेच कॉंग्रेसबरोबर गेलो तरी आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, अशी भूमिका देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केली. हिंदुत्व आमचा श्वास, आमचा प्राण आहे हे सिद्ध करण्याची आम्हांला गरज नाही असे ते म्हणाले.
“मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न सुरू”
उद्धव ठाकरे यानी आपल्या भाषणात मुंबईचा लचका तोडण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत भाजपवर टीका केली. मुंबई ही मराठी माणसाने रक्त सांडून मिळवली आहे. मुंबईचा लचका तोडण्याचा प्रयत्न केला तर तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत, अशा इशारा यावेळी ठाकरेंनी दिला. ते म्हणाले, संघ एकदाही भारताच्या स्वातंत्र लढ्यात नव्हता. तसेच संयुक्त लढ्याच्या लढाईतून पहिलं कोण फुटलं होतं तर संघ म्हणजे यांचे बाप असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला. तसेच तेव्हा पासून मुंबईचा लचका तोडण्याचं काम सुरु आहे, असा आरोप त्यांनी भाजपवर केला.