ताजी बातमी ऑनलाईन टीम
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सभेला प्रत्युत्तर दिले आहे. मी बाबरी पाडायला गेलो याचा अभिमान आहे. लाठी गोली खायेंगे, मंदिर वही बनायेंगे असे म्हणत बाबरी पाडायला गेलो होतो, असे प्रत्युत्तर यावेळी फडणवीसांनी दिले. तसेच बाबरीवरून सेनेला मिरची का लागली असा टोला देखील त्यांनी शिवसेनेला लगावला. दरम्यान शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांचे वय विचारत, सहलीला गेला होतात का असा सवाल केला होता. त्यावर आज फडणवसांनी जोरदार हल्लाबोल करत प्रत्युत्तर दिले आहे.
“मी बाबरी पाडायला गेलो होतो याचा अभिमान”
फडणवीस म्हणाले, कालची मुख्यमंत्र्यांची सभा म्हणजे लाफ्टर सभा होती, लाप्टर शो संपलाच नाही. काल कौरवांची सभा होती, आज पांडवांची सभा आहे. मी बाबरी पाडायला गेलो होतो. पण तिथे एकही शिवसैनिक दिसला नाही. शिवसैनिकांची वाट पाहिली पण कोणीच आलं नाही. आम्ही बाबरी पाडत होतो तेव्हा शेपट्या कुणी टाकल्या होत्या असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. लाठ्या खाल्या, गोळ्या चालताना पाहिल्या म्हणून इथपर्यंत पोहोचलो. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. पुढे बोलताना ते म्हणाले, कारसेवकांची थट्टा करणाऱ्यांना मी उत्तर देणार आहे. आज माझं वजन 102 किलो आहे. बाबरी पाडायला गेलो तेव्हा मांझं वजन 128 किलो होतं. पाठीत खंजीर खूपसून तुम्ही माझं राजकिय वजन कमी करू शकत नाही. उद्धवजी तुमच्या सत्तेचा ढाच्या मी पाडणार आहे अशा शब्दात फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
“मुख्यमंत्र्यांनी राज्यहिताचं एकही भाषण केलं नाही”
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यशवंत जाधवांची संपत्ती 35 वरून 53 कोटी कशी झाली? दाऊद मित्र आजही मंत्रिमंडळात का आहे? असे प्रश्न विचारत यातल्या एकाही विषयावर उद्धव ठाकरे बोलले नाहीत अशी टीका केली. तसेच अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी राज्यहिताचं एकही भाषण केलं नाही. बाळासाहेबांच्या पुत्राच्या राज्यात हनुमान चालिसा पठण म्हणजे राजद्रोह आहे आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवणे गुन्हा नाही का? असा सवाल केला. तसेच संभाजी महाराजांची हत्त्या करणाऱ्याच्या कबरीवर माथा टेकवला, राज्य सरकारला लाज वाटली पाहिजे अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.