भविष्याची तरतूद करण्यासाठी गुंतवणूक करताना काळजी घेणं आवश्यक असतं. सध्याच्या असुरक्षित वातावरणात सुरक्षित गुंतवणूक नि खात्रीशीर चांगला परतावा हवा असेल, तर ‘पोस्ट ऑफिस’ (Indian Post) हा एक सुरक्षित पर्याय आहे. पोस्टातील गुंतवणूक सध्याच्या काळात सर्वात सुरक्षित मानली जाते.
भारतात असा मोठा मध्यमवर्ग आहे, जो आजही ‘मार्केट रिस्क स्कीम’वर गुंतवणूक (Share Market Investment) करायला धजावत नाही. बाजारातील जोखमीपासून दूर सुरक्षित गुंतवणुकीसाठी तुम्ही पोस्टात तुमच्या घामाचे दाम ठेवू शकता. पोस्टानं आपल्या ग्राहकांसाठी अनेक योजना आणल्या आहेत. ज्यात पैसे सुरक्षित तर राहतातच, शिवाय चांगला परतावाही मिळतो..
पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत तुम्ही डोळे झाकून पैसा टाकू शकता. बँकांपेक्षा पोस्टात मुदत ठेवींवर ग्राहकांना अधिक परतावा तर मिळतोच, शिवाय तुमच्या पैशाला सरकारी सुरक्षा असते. पोस्ट ऑफिसच्या या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
पोस्टातील एफडीबाबत..
पोस्ट ऑफिसमध्ये ‘एफडी’ करणं सोपी प्रक्रिया आहे. तुम्ही 1, 2, 3 किंवा 5 वर्षांपर्यंत पोस्टात मुदतठेव करु शकता. त्यात 7 दिवसांपासून ते 1 वर्षापर्यंत 5.50 टक्के व्याज मिळते. 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षांच्या ‘एफडी’वर (FD) 5.50 टक्के व्याजदर आहे. 3 वर्षांसाठी 5.50 टक्के, तर 3 ते 5 वर्षांसाठी 6.70 टक्के व्याजदर मिळतो.
असे होतात फायदे..
• सगळ्यात महत्वाचे म्हणजे, पोस्टातील गुंतवणूक बाजारातील जोखमीपासून मुक्त आहे.
• तुम्हाला नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सारख्या ऑनलाइन व्यवहारांचीही सोय मिळते.
• या योजनेतून रोखीचे व्यवहार करता येतात.
• 5 वर्षांची ‘एफडी’तील गुंतवणूक ‘आयकर कलम 80C’ अंतर्गत सूट मिळण्यास पात्र आहे.
अशी करा गुंतवणूक..
पोस्टात मुदतठेव करण्यासाठी जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊन खाते उघडा. ‘एफडी’ उघडण्यासाठी तुम्हाला किमान 1000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. पोस्टाच्या ‘एफडी’मध्ये फक्त 100 च्या पटीत गुंतवणूक करता येते.. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणं आवश्यक आहे.