ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई ; भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेसाठी संघांची घोषणा केली आहे. या स्पर्धेत हरमनप्रीत कौर सुपरनोव्हाज आणि स्मृती मानधना ट्रेलब्लेझर्स संघाचे नेतृत्व करणार आहे. दीप्ती शर्माकडे व्हेलोसिटी संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे भारतीय संघाची कर्णधार मिताली राज आणि झुलन गोस्वामी यांना विश्रांती दिली गेली आहे.
अखिल भारतीय महिला निवड समितीने या 3 संघांसाठी खेळाडूंची निवड केली. प्रत्येक संघासाठी 16 खेळाडू निवडण्यात आले आहेत. आयपीएल 2022 च्या शेवटच्या टप्प्यात महिला टी-20 चॅलेंजचे आयोजन केले जाणार आहे. महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेतील यंदाच्या हंगामाचे आयोजन 23 ते 28 मे दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम येथे केले जाईल. महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेत एकूण चार सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात सुपरनोव्हाज आणि ट्रेलब्लेझर्स आमने-सामने येतील.