कोल्हापूरवासीयांच्या जिव्हाळ्याची असलेली थेट पाईपलाईन योजना कधी पूर्ण होणार आणि शहरवासीयांना शुद्ध व मुबलक पाणी कधी मिळणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. परंतु ठेकेदार कंपनीचे कामातील चालढलकपणा आणि महापालिका अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष यामुळे गेली आठ वर्षे योजना गटांगळ्या खात आहे. कोणत्याही परिस्थितीत मेअखेरपर्यंत योजना पूर्ण करु, असे महापालिका प्रशासन ठामपणे सांगत होती. परंतु ते अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. ठेकेदार कंपनीनेच 31 डिसेंबरपर्यंत योजना पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
तब्बल 500 कोटींच्या योजनेचे भूमिपूजन ऑगस्ट 2014 मध्ये करण्यात आले. अडीच वर्षांत योजना पूर्ण करण्याची अट ठेकेदार कंपनीवर होती. परंतु अद्यापही योजना पूर्ण झालेली नाही. ठेकेदार कंपनीने आतापर्यंत चारवेळा मुदतवाढ मागून घेतली आहे. 31 मे 2022 ची मुदत संपणार असल्याने तत्पूर्वीच ठेकेदार कंपनीने मुदतवाढ मागितली आहे. महापालिका प्रशासनाने अद्याप त्यावर निर्णय दिलेला नाही. परंतु या मुदतीत तरी ठेकेदार कंपनी थेट पाईपलाईनचे काम पूर्ण करून कोल्हापूरकरांना पाणी देणार का, असा प्रश्न आहे. काळम्मावाडी धरणातील जॅकवेल क्र. 1 व 2, धरण क्षेत्रातील इन्स्पेक्सन नेल, धरण क्षेत्रात प्रेशर टँक बांधणे, सोळांकूरमध्ये पाईपलाईन टाकणे, बिद्री ते काळम्मावाडी विद्युत वाहिन्या यासह इतर कामे प्रलंबित आहेत. ठेकेदार कंपनीला आतापर्यंत सुमारे सव्वाचारशे कोटी रुपये बिलापोटी देण्यात आले आहेत.