ताजी बातमी ऑनलाईन टीम
नवी दिल्ली : भीषण उकाड्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याने देशात टोमॅटोच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. दक्षिण भारतात टोमॅटोचे दर ९० रुपयांपर्यंत तर उत्तर भारतात हे दर ५० ते ६० रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत. येत्या महिन्याभरात हे दर ८० ते १०० रुपये किलोपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. ग्राहक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशातील घाऊक बाजारात टोमॅटोची ४० ते ८४ रुपये किलोप्रमाणे विक्री केली जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी हे दर ३० ते ६० रुपये किलो एवढे होते.
राजधानी दिल्लीत टोमॅटोचे घाऊक दर ४० ते ५० रुपये, भोपाळमध्ये ३० ते ४० रुपये, लखनौत ४० ते ५० रुपये तर मुंबईत ६० ते ७० रुपयांपर्यंत पोहचले आहे. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत हे दर २० ते ३० रुपयांपर्यंत होते. दक्षिण तसेच पुर्व भारतात टोमॅटोचे दर वधारले आहे. कर्नाटकमधील शिमोगा येथे ८४ रुपये किलो प्रमाणे टोमॅटोची विक्री केली जात आहे. तर आंधप्रदेशच्या कुरनूल मध्ये ७९ रुपये, ओडिशातील कटक येथे ७५ रुपये किलोप्रमाणे टोमॅटोची विक्री केली जात आहे.