Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाआरसीबी पहिल्या सामन्यात का उतरणार निळ्या रंगाच्या जर्सीत? जाणून घ्या...

आरसीबी पहिल्या सामन्यात का उतरणार निळ्या रंगाच्या जर्सीत? जाणून घ्या…


येत्या १९ सप्टेंबरपासून आयपीएल १४ व्या हंगामाचा उर्वरित हंगाम युएईमध्ये सुरु होत आहे. यासाठी आयपीएल फ्रेंचायजींनी आपला तळ दुबईत हलवला असून सर्वजण जय्यत तयारी करत आहेत. दरम्यान, रॉयल चॅलेंजर बेंगलोर ( आरसीबी ) आपला पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर २० सप्टेंबरला अबु धाबीत खेळणार आहे.
या सामन्यासाठी आरसीबी आपल्या नेहमीच्या जर्सीत बदल करणार आहे. आरसीबीने आज आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची अधिकृत घोषणा केली. आरसीबीने ‘आरसीबी २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या केकेआर विरुद्धच्या सामन्यात निळ्या जर्सीत मैदानात उतरेल. आम्ही फ्रंट लाईन वर्कर्सच्या पीपीई कीटचा रंग आमच्या जर्सीला दिला आहे. याद्वारे आम्ही कोरोना काळातील हिरो फ्रंट लाईन वर्कर्सना मानवंदना देणार आहोत.’ असे ट्विट केले आहे.

तत्पूर्वी या वर्षी आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने त्याची फ्रेंचायजी बंगळुरु आणि देशातील इतर शहरांमधील आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी आर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. गेल्या वर्षी कोरोना महामारी सुरु झाल्यापासून आरसीबीची मातृ कंपनी डियागो इंडियाने ३ लाख लिटर सॅनिटायझर निर्मिती करुन त्याचे वितरण केले होते.

आयपीएलचा उर्वरित १४ वा हंगाम १९ सप्टेंबरपासून सुरु
आयपीएलचा उर्विरित १४ वा हंगाम संघांच्या बायोबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने मे महिन्यात पुढे ढकलण्यात आला होता. आता हा हंगाम १९ सप्टेंबर पासून युएईमध्ये सुरु होणार आहे. या उर्वरित हंगावाची सुरुवात मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने होणार आहे.
त्यानंतर अबु धाबीत केकेआर विरुद्ध आरसीबी असा सामना रंगणार आहे. आयपीएलच्या उर्विरत १४ व्या हंगामात दुबईत १३, शारजाहमध्ये १० आणि अबु धाबीत ८ सामने होणार आहेत. या उर्वरित हंगामात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून बीसीसीआयने ४६ पानी आरोग्य मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध केली आहेत. जे कोणी आयपीएलशी निगडीत आहेत त्या सर्वांना या मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -