ताजी बातमी ऑनलाईन टीम
इंदापूर तालुक्यातील निरा नदीकाठी वसलेल्या लुमेवाडी, लिबुडी, गोंदी या गावांच्या परिसरात कुत्र्यांच्या कळपाने केलेल्या हल्ल्यामध्ये आतापर्यंत 40 ते 50 शेळ्या मृत्युमुखी पडल्या, 7 ते 8 नागरिक जखमी झाले आहेत. सध्या या परिसरात कुत्र्यांच्या कळपांची एवढी दहशत आहे, की शेतकरी शेतात एकटे न जाता समूहाने हातात काठ्या घेऊन जात आहेत.गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे या भागातील नागरिक व शेतकरी घाबरले आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या कळपात सुमारे 12 ते 15 कुत्री आहेत. या कळपाने शेळ्यांना लक्ष्य केले आहे. कुत्री शेळ्या मारून फस्त करीत असल्याने शेतात शेळ्यांना चरायला घेऊन जाण्याचे शेतकऱ्यांनी बंद केले आहे. तसेच कुत्र्यांचा कळप माणसांवर हल्ले करीत असल्याने लहान मुलांना घराबाहेर पाठविण्यास अनेकांना भीती वाटत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले नागरिक अकलूजच्या (ता. माळशिरस) सरकारी दवाखान्यात औषधोपचार करीत आहेत. लुमेवाडी येथे कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे घाबरून जाऊन जमिनीवर पडल्याने दोन नागरिक हाडे मोडून गंभीर जखमी झाले आहेत.
बेवारस कुत्र्यांना खाण्यासाठी अन्न मिळत नसल्याने ते शेळ्या व माणसांवर हल्ला करीत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात शेळ्या मृत्युमुखी पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून बाधित कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी लुमेवाडीचे माजी सरपंच कमल जमादार यांनी केली आहे. सध्या या परिसरातील नागरिकांचे जनजीवन कुत्र्यांच्या भीतीमुळे विस्कळीत झाले आहे. शासनाने कुत्र्यांच्या कळपांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, यासंदर्भात नागरिकांनी पोलिस व पंचायत समितीकडे तक्रारी केल्या आहेत.