ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर : पावसाचे प्रमाण वाढणार… धरणांतून पाणी सोडणार… अशा आपत्कालीन परिस्थितीतील प्रत्येक अपटेड आता पूरबाधित क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला मोबाईल फोनवर मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने बाधित क्षेत्रातील व गावांतील डेटाबेस संकलनाचे काम सुरू केले आहे. यामुळे बाधित क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला पाऊस, पूर आदींसह नैसर्गिक आपत्तींबाबतचा ‘अलर्ट’ मिळणार आहे.
जिल्ह्यात 2005 आणि 2006 साली पूरस्थिती गंभीर झाली होती. यानंतर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा प्रभावी करण्यात आली. 2019 आणि 2021 सालीही जिल्ह्याला पुराचा मोठा तडाखा बसला यामध्ये वित्तहानी झाली असली, तरी सुदैवाने मोठी जीवितहानी झाली नाही.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीत कमीत कमी वित्तहानी तसेच जीवितहानी होणार नाही, याच दृष्टीने प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत, त्यामध्ये ‘पब्लिक ॲड्रेस सिस्टीम’ची आता राज्यभर दखल घेण्यात आली. यामध्ये आता बाधित क्षेत्रातील प्रत्येक कुटुंबाला ‘अलर्ट’ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात 2021 साली पूरबाधित झालेल्या 409 गावांतील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीचा डेटाबेस तयार केला जात आहे. यासाठी दोन दिवसांत जिल्ह्यातील 3 हजार कुटुंबांची नोंदणी झाल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.