ताजी बातमी ऑनलाईन टीम
शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्याशी संबंधित सात ठिकाणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थाने, कार्यालये आणि मालमत्तांवर छापेमारी केल्यानंतर ही चौकशी सुरु आहे. ईडीकडे अनिल परब यांच्याविरोधात काही ठोस पुरावे असल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचे बोलले जाते. एकूणच ईडीच्या या कारवाईने राज्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
ईडीने गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात पहिल्यांदा मंत्री अनिल परब यांना चौकशीला हजर रहाण्यासाठी नोटीस बजावली होती. त्यानंतर ईडीने 30 ऑगस्ट रोजी तीन ठिकाणी छापेमारी केली. यात परबांचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) बजरंग खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर छापेमारी करुन काही कागदपत्रे आणि महत्वाचे दस्तऐवज ताब्यात घेतले होते.
मंत्री अनिल परब यांनी पहिल्या समन्सनंतर चौकशीला हजर न रहाता ईडीकडे वेळ मागितला होता. त्यानंतर ईडीने खरमाटे यांच्यासह वाहन निरिक्षक गजेंद्र पाटील यांचीही चौकशी करुन त्यांचा जबाब नोंदविला.
पुढे ईडीने अनिल परब यांना पुन्हा समन्स बजावून 28 सप्टेंबर रोजी ईडीच्या मुंबईतील कार्यालयात चौकशीला हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार अनिल परब हे ईडी कार्यालयात दाखल झाले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सात तास कसून चौकशी केली होती.
नंतरच्या काळात ईडीचा तपास थंडावला. प्राप्तीकर खात्याने 8 मार्च रोजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे विश्वासू निकटवर्तीय उद्योजक राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे लेखापरीक्षक (सीए) असलेल्या व्ही. एस. परब असोसिएटस आणि निकटवर्तीय संजय कदम यांच्या अंधेरीतील कैलास नगरमध्ये असलेल्या स्वान लेक या इमारतीतील घरासह पुण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी बजरंग खरमाटे यांचे घर आणि मालमत्ता अशा मुंबईसह पुणे, सांगली, रत्नागिरीत तब्बल 26 हुन अधिक ठिकाणी छापेमारी करत शोधमोहीम राबविली होती.