ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज, बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रातसह बिहार आणि उत्तर प्रदेशातील ३० जागांसाठी हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. ६ जुलै ते २१ जुलै २०२२ दरम्यान हे सदस्य निवृत्त होत असल्याने विधानपरिषदेचे ही द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येईल.
महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य सुजितसिंह मानसिंह ठाकूर, विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण यशवंत दरेकर, कॅबिनेट मंत्री सुभाष राजाराम देसाई, रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर, संजय पंडितराव दौंड, विनायक तुकाराम मेटे, प्रसाद मिनेश लाड, दिवाकर नारायण रावते व रामनिवास सत्यनारायण सिंह निवृत्त होत आहेत.
या निवडणुकीसाठी २ जून रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. निवडणूक अर्ज भरण्याची अंतिम तारीख ९ जून पर्यंत राहील. १३ पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान २० जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार असून त्याचदिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांनी या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाय योजना करण्याविषयी निर्देश आयोगाने दिले आहेत.