ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी नगरपरिषदेच्या सन सन 2020-21 चे दुरुस्ती आणि सन 2022-23 च्या तब्बल 420 कोटी रुपये खर्चाच्या वार्षिक अंदाजपत्रकास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी विविध अटी आणि शर्ती घालून मंजुरी दिली आहे अंदाजपत्रकास मंजुरी मिळाल्यामुळे शहरातील रखडलेल्या विविध विकासकामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
इचलकरंजी नगरपरिषदेवर जानेवारी 2022 पासून प्रशासक म्हणून मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल हे काम पहात आहेत. 30 डिसेंबर 2021 रोजी सभागृहाची मुदत संपल्यामुळे चालू वर्षीचे अंदाजपत्रक हे प्रशासनाकडून तयार करण्यात आले. सुमारे 420 कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आले होते. त्यामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या त्रुटी दूर करण्याच्या सूचना नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सर्व त्रुटी करुन पुनश्च अंदाजपत्रक पाठविण्यात आले होते. पण मे महिना संपत आला तरी अंदाजपत्रक मंजुर न झाल्याने शहरातील अनेक विकासकामे थांबली होती.
अखेर जिल्हाधिकारी रेखावार यांनी सुमारे 420 कोटी रुपये खर्चाच्या वार्षिक अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी दिली आहे. पण दिलेल्या अटी-शर्ती मध्ये पाणीपट्टीत वाढ करावी, थकीत कराची 100 टक्के वसुली करावी, नागरी उपजिविका अभियानवरील अनुदानाचा 100 टक्के विनियोग व्हावा, वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करावे, मक्तेदारांची जूनी देणी आदा केल्यानंतरच शिल्लक तरतूदीमधूनच निविदा काढाव्यात, पर्यावरण विषयक बाबींवर एकूण भांडवली खर्चाच्या 25 टक्के रक्कम खर्च करावी आदी बाबींचा समावेश आहे.
मंजूर अंदाजपत्रकामध्ये आर्थिक दुर्बल घटक (41 लाख), महिला व बाल कल्याण (41 लाख), क्रिडा विषयक (48 लाख), दिव्यांग घटक (41 लाख), कर्ज फेड हिस्सा (29 लाख), अनामत परतफेड (9 कोटी), पर्यावरण संरक्षण (52 कोटी), वृक्ष संवर्धन (20 लाख), निवडणूक खर्च (2.50 कोटी), रस्ता निधी (3.36 कोटी) अशी विशेष तरतूद करण्यात आली आहे.