ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन राज्यात मोठ्या घडामोडी सुरु आहेत. सहा जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत शिवसेनेनं दोन उमेदवार दिल्यानं अपक्ष निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. संभाजीराजे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली असताना आता त्यांना माघार घ्यावी लागणार का? अशी स्थिती निर्माण झाली आहे.
कारण, संभाजीराजे यांनी सर्व राजकीय पक्षांना सहकार्याचं आवाहन केलं होतं. मात्र, शिवसेनेनं कोल्हापूरच्याच संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केलीय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही भूमिका बदलत शिवसेनेच्याच उमेदवाराला राष्ट्रवादीची शिल्लक राहणारी मतं दिली जातील असं जाहीर केलं आहे. त्यामुळे संभाजीराजे यांना आता माघार घ्यावी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे. त्यावेळी ते मन मोकळं करु शकतात. त्यामुळे संभाजीराजे पत्रकार परिषदेत काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राजेंच्या भूमिकेकडे राज्यभराचं लक्ष्य
संभाजीराजे छत्रपती आज (27 मे) सकाळी 11 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेणार आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे आपली पुढील भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहेत. त्यासाठी सर्व माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं आहे.