ताजी बातमी ऑनलाईन टीम
जगावर असलेले कोरोनाचे सावट अद्याप काही संपले नाही. कोरोनाची भीती पुन्हा वाढू लागली आहे. कारण कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. अशामध्ये महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मुंबईमध्ये देखील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी नागरिकांना मास्कचा वापर करावा, असे आवाहन केले आहे. अशामध्ये आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध येण्याची शक्यता मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Minister Aslam Sheikh) यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर दैनंदिन प्रकरणे 1 हजारांच्या वर वाढली तर पुन्हा निर्बंध लादण्याची आवश्यकता असेल.’ तसंच, ‘ज्यापद्धतीने कोरोना रुग्ण वाढत आहेत त्यामुळे निर्बंध आणावेच लागतील. विमानसेवेमध्ये अद्याप निर्बंध कायम आहेत. लोकांनी काळजी घेतली नाही आणि रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.’, असे अस्लम शेख यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत मास्कचा वापर करावा असे आवाहन केले जात आहे.
दरम्यान, मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारची चिंता पुन्हा वाढली आहे. गुरुवारी राज्यात 500 पेक्षा अधिक नवीन प्रकरणांची नोंद झाली. मुंबईत कोरोना रुग्णांनी 300 चा टप्पा ओलांडल्यामुळे रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबई महानगरपालिकेने सप्टेंबर महिन्यात कोरोनाची चौथी लाट येऊ शकते, असे सांगितले होते. आता रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याचसोबत मुंबईमध्ये लोकल प्रवास करताना आणि रेल्वे स्थानकामध्ये प्रवेश करत असताना नागरिकांना मास्कची सक्ती करण्यात आली आहे.