ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या काही दिवसांपासून कापूस, सूत दरात होत असलेल्या भरमसाठ वाढीमुळे यंत्रमाग व्यवसाय संकटात सापडला आहे. आधीच विविध कारणामुळे मंदीच्या छायेत असलेल्या यंत्रमाग व्यवसायाला दरवाढीमुळे मंदीच्या आणखीन खाईत लोटण्याचा प्रकार होत चालला आहे. या कारणामुळे शहरातील अनेक कारखानदार आपला व्यवसाय बंद ठेवणेच पसंत करीत आहेत.
अशीच परिस्थिती राहील्यास संपूर्ण वस्त्रोद्योगालाच उतरती कळा लागेल, अशी भिती जाणकारातून व्यक्त केली जात आहे.
यंत्रमागासाठी प्रमुख कच्चा माल असलेले सूताचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तर कापूस कधी नव्हे ते खंडीचे दर लाखाचा टप्पा पार केला आहे. त्याचबरोबर बाजारपेठेत कापूस टंचाईही जाणवत आहे. याचा मोठा फटका सुत गिरण्या त्याचबरोबर यंत्रमाग व्यवसायालाही बसत आहे.
बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. कोणत्याही प्रकारच्या कापडाला म्हणावी तशी मागणी
अथवा दर मिळत नसल्याने यंत्रमागधारक नुकसानीत आपला व्यवसाय करीत आहेत. सध्या साधा यंत्रमागधारक मिटरला दीड ते दोन रूपये तर अत्याधुनिक यंत्रमागधारक मिटरला चार ते पाच रूपये नुकसानीत व्यवसाय करीत आहे.
शेती खालोखाल रोजगार मिळवून देणाऱ्या वस्त्रोद्योगाकडे केंद्राचे त्याचबरोबर राज्याचे म्हणावे तसे लक्ष नाही. सरकारने सुत दरावर नियंत्रण ठेवावे, अशी वारंवार मागणी केली जाते. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप व्यवसायधारकांतून केला जात आहे. वर्षातून ८ महिने मंदित तर चार महिने तेजीत असलेल्या या व्यवसायामध्ये शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
वस्त्रोद्योगाला चांगले दिवस आणण्यासाठी वस्त्रोद्योग सेक्टरमधील लोकप्रतिनिधींनी राज्य स्तरावर तसेच केंद्रावर दबाव टाकून यंत्रमागधारकांना विविध सवलती बरोबर सुत दर स्थीर ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा हा व्यवसायच पुर्णपणे कोलमडेल, अशी भिती व्यवसायधारकांतून व्यक्त केली जात आहे.