ताजी बातमी ऑनलाईन अर्ज
कोल्हापूर: विरोधक संभाजीराजे यांना डावलल्यामुळे छत्रपतींचा अपमान केला अशी टीका करत आहेत, त्यावरून बोलताना राऊत यांनी विरोधकांचा समाचार घेतला. छत्रपती शिवाजी महाराज हे कोणाच्या मालकीचे नाहीत. ते संपूर्ण विश्वाचे आहेत. असा पलटवार विरोधकांवर केला. ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.
पत्रकार परिषदेच्या सुरवातीला त्यांनी कोल्हापूरचे शिवसैनिक संजय पवार यांचे अभिनंदन करून, माझ्या बाजूला नवचर्चित खासदार बसले आहेत. आता तेच सविस्तर बोलतील असे म्हणताच सर्वत्र हशा पिकला. कोल्हापुरात मी शिवसंपर्क मोहिमेसाठी आलो आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर हॉट झाले आहे. जिल्ह्यात शिवसेनेचे संघटन वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठीच माझा दौरा पूर्णपणे संघटनेच्या बांधणीसाठी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचना आहेत. त्या सूचना प्रत्येक शिवसैनिकांपर्यंत पोहचवायच्या आहेत. २०२४ च्या निवडणुकीपर्यंत प्रत्येक शिवसैनिक तयार झाला .पाहिजे,यासाठी हा उपक्रम आहे असे संजय राऊत म्हणाले.
संभाजीराजे छत्रपती यांच्यावरून खूप राजकारण घडले जात आहे. अनेकजण २०२४ च्या निवडणुकीबाबत तर्क वितर्क लढवत आहेत. त्याबाबत बोलताना संजय राऊत यांनी, २०२४ च्या निवडणूक कशा लढल्या जातात हे पुढे पाहू. या राज्यात विरोधी पक्ष केवळ विरोधाला विरोध करत आहे. एखादा निर्णय घेतला की त्याला विरोध करण्याचे त्यांनी ठरवले आहे. यातून त्यांना आसुरी आनंद मिळतो की काय? हे माहिती नाही. मात्र त्याची पर्वा न करता महाविकास आघाडी ठामपणे पुढे चालली आहे. असा टोलाही राऊत यांनी लगावला.
संभाजीराजे छत्रपती यांनी काल मनमोकळं केले आहे. त्यामुळे त्यांचाही विषय आमच्यासाठी संपला आहे. ४२ मतांचा प्रश्न होता. राजकारण करत असताना कोणत्या ना कोणत्या पक्षाचा राग धरावा लागतो,असेही राऊत म्हणाले.
अडीच वर्षे चाललो आहे, आता पंचवीस वर्षे सोबत पुढे चालू.पाच वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. असेही राऊत म्हणाले.
ठरवून संभाजीराजे यांची कोंडी केली, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, याला उत्तर देताना संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया देत फडणवीस यांचा समाचार घेतला. भाजपचा यात काहीही संबंध नाही. त्यांनी चोंबडेपणा करू! असे राऊत म्हणाले.