सांगलीतील 100 फुटी रोडवरील बुर्जी गाडी चालकाच्या खून प्रकरणातील आरोपींच्या चार तासांत मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला यश आले. याप्रकरणी पाच जणांना अटक केली असून, या गुन्हयात तीन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
आकाश सचिन शिंदे (वय 19 रा. आजना मशीदसमोर, सांगली), वैभव राजू शिंदे (वय 23 रा. जयसिंगपूर), निहाल बशीर नदाफ (वय 23), अकिब सरफराज नदाफ (वय 20 दोघेही रा. उदगाव, जि. कोल्हापूर) आणि सफवान जमीन बागवान (वय 21 रा. आजी मशीद जवळ, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींककडून गुह्यात वापरलेल्या दोन दुचाकी असा एकूण 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचे तपासात उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृत संतोष पवार याचा माऊली एग जंक्शन नावाने 100 फुटी रोडवरील आंबेडकर वाचनालयासमोर बुर्जीचा गाडा आहे. याच्या पाठीमागे मोती चौकात पवार आपल्या आईसह रहात होता. रविवारी सायंकाळी पवार गाडा घेऊन नेहमीच्या ठिकाणी आला. यावेळी आठ हल्लेखोर तेथे आले. सर्वांनी पवारला बेदम मारहाण केली. हल्लेखोर एकाने पवारवर चाकूने वार केले. जखमी पवार याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागसह विश्रामबाग आणि शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तपास सुरू असतानाच गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांना आरोपी कोल्हापूर रोडवरील आदिनाथ मंगल कार्यालयामागे लपल्याचे समजले. पोलिसांनी तातडीने छापा टाकून पाचजणांना ताब्यात घेतले. त्यांनी गुह्याची कबुली दिली आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार, पालवे, संकेत मगदुम, संदीप पाटील, संतोष गुरव, दीपक गायकवाड, राहुल जाधव, नागेश खरात, वैभव पाटील, आर्यन देशिंगकर, शिवाजी ठोकळ यांनी ही कामगिरी केली.