शिवसेना नेते संजय राऊत यांनी कोल्हापुरात येऊन थेट सतेज पाटील यांच्याशीच पंगा घेतला आहे. निमित्त होते कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका. येथील भाषणात बोलताना त्यांनी सतेज पाटील यांचे नाव न घेता यापुढे आमचं ठरलंय वगैरे काही चालणार नाही. शिवसेनाच यापुढे जे काय आहे ते ठरवणार असे म्हटले. दरम्यान, ज्या पालकमंत्री सतेज पाटलांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्याती महाविकास आघाडी निर्माण होण्याआधीच ती कोल्हापुरात निर्माण केली होती, याचाच राऊतांना विसर पडल्याचे बोलले जात आहे.
बोलताना शिवसेना नेते संजय राऊत
काय म्हणाले संजय राऊत?
कोल्हापूरमध्ये आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, यापुढे कोल्हापुरातील प्रत्येक निवडणूक ही जिंकण्यासाठीच लढायला पाहिजे. आम्ही ठरवलंय, ठरणार, आमचंच ठरलंय वाल्याला सुद्धा घरी पाठवायची वेळ येईल. यापुढे फक्त शिवसेनाच ठरवणार आणि इथले शिवसेनेचे नेतेच ठरवणार असल्याचे राऊत यांनी म्हटले. दरम्यान, सतेज पाटील यांनी यापूर्वी शिवसेनेला सोबत घेऊनच महापालिका, तसेच इतर ठिकाणी सत्ता स्थापन केली आहे. विशेष म्हणजे, राज्यात महाविकास आघाडी स्थापन झाली नव्हती त्याच्या आधी कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्तेत होते. शिवसेनेला महत्वाचे पद सुद्धा देण्यात आले होती.
त्यामुळेच कोल्हापुरात शिवसेनेचा खासदार, याचा राऊतांना विसर?
संजय राऊत यांनी यापुढे आमचं ठरलंय वगैरे काहीही चालणार नाही बोलले. मात्र याच आमचं ठरलंय वाक्यानंतर लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांचा विजय झाला होता. सतेज पाटील काँग्रेसचे नेते असून सुद्धा त्यांनी संजय मंडलिक यांना आपलं ठरलंय म्हणत उघड पाठिंबा दर्शविला होता. शिवाय गेल्या 2 महापालिका निवडणुकीत शिवसेनेला सोबत घेऊनच सत्ता स्थापन केली आहे. मात्र या सर्वांचा राऊत यांना विसर पडल्याचे यावरून स्पष्ट झाले. शिवाय यापुढे आपलं ठरलंय चालणार नाही, जे काय आहे ते शिवसेनाच ठरवणार असल्याचे म्हणत थेट सतेज पाटील यांच्याशी पंगा घेतला आहे.
राऊत यांनी सतेज पाटलांवर निशाणा साधण्याचे काय कारण?
कोल्हापूरात गेल्या 8 ते 9 निवडणुका या केवळ पालकमंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी यशस्वी घोडदौड सुरू ठेवली आहे.
कोणतीही निवडणूक हलक्यात घ्यायची नाही असेच जणू त्यांनी ठरवले आहे. नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणुकीत सुद्धा सतेज पाटील काँग्रेसची जागा कायम राखण्यात यशस्वी झाले. त्यांच्या या यशानंतर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली. कोल्हापुरात काँग्रेसचे वाढत असलेले वर्चस्व पाहता आता राऊत यांनी थेट सतेज पाटील यांच्यावरच त्यांचे नाव न घेता निशाणा साधला असल्याचे बोलले जाते. एव्हढेच नाही तर जिल्हा परिषदेच्या गट-गण रचना आशा पद्धतीने केली आहे ज्यामध्ये शिवसेनेच्या जागा निवडूनच येणार नाहीत, असा काही स्थानिक नेत्यांनी कोणाचेही नाव न घेता आरोप केला आहे.