ताजी बातमी ऑनलाईन टीम
भिंत अंगावर कोसळून शिवाजी बिराप्पा पुजारी वर ४५, रा. सहारानगर, रुई या इसमाचा दुदैवी मृत्यू झाला. सदरची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास भोनेमाळमध्ये घडली. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे.
शिवाजी पुजारी व त्यांचा मुलगा सागर पुजारी हे दोघे ट्रॅक्टरवर मजुरीचे काम करतात. भोने माळ येथे मांढरेकर नामक व्यक्तीचे घर पाडण्याचे काम मक्तेदार कबनुरे यांनी घेतले आहे. त्या ठिकाणी शिवाजी हे भिंत उतरण्याचे काम करत असताना त्यांच्या अंगावर सुमारे ८ फुटांची भिंत कोसळली.
हे पाहून सागर याने आरडाओरडा करत त्यांच्या अंगावरील दगड, विटा, माती बाजुला करून बाहेर काढले. मात्र ते बेशुद्ध अवस्थेत असल्याने आयजीएम | रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ३ मुली, नातवंडे असा परिवार आहे. याबाबतची वर्दी सागर पुजारी यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोहेकॉ पाथरवट हे करत आहेत.