खोची येथील पूल बांधकामासाठी वारणा नदीपात्रात टाकण्यात आलेला भराव काढण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून संबंधित बांधकाम विभागाला पत्र पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना जवळून जोडणाऱ्या खोचीदुधगाव दरम्यान वारणा नदीवर नवीन पूल बांधण्यात आला आहे. हा पूल बांधताना नदीपात्रात पुलाचे कॉलम व स्लॅब जोडण्यासाठी पाणी प्रवाह वळविण्यासाठी तात्पुरता भराव टाकून जमीन सपाटीकरण करण्यात आले होते. पूर्वी तीन गाळ्यांमध्ये हा भराव टाकला होता तो काढला आहे. मात्र, नंतर तीन गाळ्यामध्ये टाकलेला भरावा तसाच आहे.
सध्या या पुलाचे तब्बल साडेसहा वर्षानंतर पूर्ण झाले आहे. परंतु, पूल बांधकामासाठी कॉलम व स्लॅब टाकण्यासाठी नदीपात्रात जो भराव टाकला होता. तसेच नदीपात्रात जमिनीशी संलग्न आडवे कॉलम तयार केले होते ते अजूनही काढले गेलेले नाहीत. त्यामुळे नदीपात्रातील पाणी प्रवाहास अडथळा होत आहे.. सध्या थोड्या दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. या भागातून वारणा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात सतत वाहत असते. तसेच वारंवार याठिकाणी महापूर येत आहे. या नदीपात्रातील भराव अडचणीमुळे पाणी प्रवाहास अडथळा होत आहे, असा निष्कर्ष पाटबंधारे विभागाच्या वतीने जानेवारी महिन्यात काढण्यात आला.
त्यावेळी संबंधित बाधकाम विभागाला जानेवारी महिन्यामध्ये पत्र पाठवून संबंधित भराव काढण्यास सांगितले आहे. पण अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही. पावसाळा लवकरच सुरू होणार आहे. पुलाशेजारी कोल्हापूर पद्धतीचा जुना बंधारा आहे. या बंधाऱ्याचे बर्गेही पावसाळ्यात पाणी प्रवाहास अडथळा होऊ नये म्हणून सध्या काढले आहेत. त्यामुळे पाणी प्रवाह कायम राहणार आहे.
तसेच सध्या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नदी पात्रातील पाण्याच्या प्रवाहास अडथळा होत असलेला भराव तात्काळ काढावा, अशी मागणी पाटबंधारे विभागासह या भागातील नागरिकांतून होत आहे.
भरावासाठी मुरमाचा तुटवडा
सध्या या पुलाच्या दुधगावकडील बाजूस भराव टाकण्याचे काम चालू आहे. या ठिकाणी भरावासाठी मुरमाचा तुटवडा आहे. त्यामुळे नदीतील पाण्याच्या प्रवाहास अडथळा होणारा हा भरावा या ठिकाणी वापरावा व नदीपात्रातील अडथळा दूर करावा, अशीही मागणी काही सुज्ञ नागरिक करत आहेत.